मुंबई : काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांच्या मुलाला आज मनपाने जोरदार दणका दिला. कलिनातल्या अवधूत इमारतीत कृपाशंकर सिंग यांच्या मुलाच्या फ्लॅटवर हातोडा चालवला. हे फ्लॅट अनधिकृत असल्याचे पुढे आलेय.
अवधूत इमारतीत 11 आणि 12 व्या मजल्यावर हे फ्लॅट होते. इमारतीला 10 व्या मजल्यापर्यंतच परवानगी होती. त्यामुळे मनपाने 11 आणि बाराव्या मजल्यावर हातोडा चालवत सिंग यांच्या मुलाचे फ्लॅट्स पाडले.
महापालिकेच्या एच पूर्व विभागीय कार्यालयाने आज सीएसटी रोड कलिना येथील अवधूत इमारतीतील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. वॉर्ड ऑफिसर प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
12 मजल्याच्या या इमारतीचे 7 मजले अधिकृत असल्याची माहिती प्रशांत गायकवाड यांनी दिली, मात्र थेट कॅमेरावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तसेच कारवाई करण्यात आलेल्या 11 आणि 12 व्या मजल्यावर माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या मुलाचा फ्लॅट होता.
या मजल्यांवर तुलनेने सौम्य कारवाई केल्याचा आरोप इमारतीतील रहिवाशी विवेक महाजन यांनी केलाय. महाजन यांचे आठव्या मजल्यावर घर आहे. त्यांच्या घरावरही कारवाई करण्यात आलीय. मात्र बिल्डरकडून फसवणूक झाल्याची प्रतिक्रिया महाजन यांनी दिली.