मिलिंद देवरांनी केली मुख्यमंत्र्यांची कोंडी

आदर्श घोटाळा प्रकरणात राज्य सरकारची आणखी नाचक्की झालीय. मिलिंद देवरांनी याप्रकरणी नवा बॉम्बगोळा टाकत मुख्यमंत्र्यांना अधिक गोत्यात आणलंय. आदर्श प्रकरणी विधानसभेत चर्चा व्हायला हवी तसेच दोषींवर कारवाई व्हायला हवी, असं थेट वक्तव्य देवरा यांनी केलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 29, 2013, 08:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आदर्श घोटाळा प्रकरणात राज्य सरकारची आणखी नाचक्की झालीय. मिलिंद देवरांनी याप्रकरणी नवा बॉम्बगोळा टाकत मुख्यमंत्र्यांना अधिक गोत्यात आणलंय. आदर्श प्रकरणी विधानसभेत चर्चा व्हायला हवी तसेच दोषींवर कारवाई व्हायला हवी, असं थेट वक्तव्य देवरा यांनी केलंय.
आदर्श अहवाल राज्य सरकारनं फेटाळल्यानंतर विरोधकांच्या टीकेबरोबरच केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरांनीही ट्वीट करुन नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही देवरांची भूमिका उचलून धरल्यानं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची चांगलीच गोची झाली. हे वादळ शमत नाही तोच मिलिंद देवरांनी पुन्हा एकदा झी मिडियाशी बोलताना नवा बॉम्बगोळा टाकलाय. आदर्श अहवालावर विधानसभेत चर्चा व्हावी आणि यातील दोषींवर कारवाईची गरज त्यांनी व्यक्त केलीय.
भाजपनंही विशेष अधिवेशन बोलावून आदर्श अहवालावर चर्चा करण्याची मागणी केलीय. म्हणजे भाजपचीच भूमिका मिलिंद देवरा मांडत असल्यानं विरोधकांच्या गोटात मात्र आनंदाचं वातावरण आहे. आदर्श अहवाल प्रकरण सध्या पेटलं असलं तरी यासाठीच्या दारूगोळ्याचा पुरवठा मात्र काँग्रेसमधूनच होताना दिसतोय. याचा लाभ मात्र विरोधक उठवत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.