मुंबई : शुल्लक कारणं, मतभेदांवरून नात्यांचा खून होण्याच्या घटना घडत असताना, कांदिवलीत रस्त्यावरच्या एका मुलीचे प्राण वाचविण्यासाठी एका युवक - युवतीनं जीवाचं अक्षरशः रान केलं. रक्ताचं नातं नसतांनाही त्या तरुण-तरुणीनं त्या चिमुरडीसाठी दिवसरात्र एक केला. कुठून मिळाली त्यांना ही प्रेरणा.
कांदिवलीतील तेरेसा द ओशन ऑफ ह्युमॅनिटी फाऊंडेशन मध्ये दररोज कानी पडणारा लहानग्या तेजलचा किलबिलाट अचानक बंद झाला होता. काही दिवसांपासून ती इथे येत नव्हती आणि त्याचं कारणही कुणाला कळत नव्हतं. संस्थेचा सर्वेसर्वा असलेले प्रिन्सकुमार तिवारी आणि पायल शहा तेजलच्या अनुपस्थितीनं अस्वस्थ झाले होते. अखेर त्यांनी तिच्या न येण्याचं कारण शोधून काढलं. रस्त्यावर राहाणाऱ्या तेजलचं जन्मतःच लसीकरण न झाल्यानं ती गंभीर आजारी होती.
गेल्या २६ जानेवारीला तिला कांदिवली पूर्व भागातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण ती उपचाराला फारसा प्रतिसाद देत नव्हती. मग प्रिन्सकुमार आणि पायलनं तेजलच्या उपचाराची जबाबदारी उचलली. अंधेरीतील कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केलं. आता तिची प्रकृती धोक्याच्या पूर्ण बाहेर आहे.
आज तेजलप्रमाणे रस्त्यावरच्या ७३ मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी प्रिन्सकुमार आणि पायलनं उचललीय. प्रिन्सकुमार हा २३ वर्षांचा तरुण, तर पायलही त्याच वयाची. दोघंही उच्चशिक्षित. पण आता त्यांनी या मुलांचं भवितव्य स्वतःचं मिशन बनवलंय. रस्त्यावर राहाणाऱ्या मुलांसाठी कांदिवलीच्या पूलाखाली त्यांनी चार वर्षांपूर्वी एक शाळा सुरु केली. आता ही सर्व मुलं परिसरातल्या ठाकूर शामनारायण हायस्कूलमध्ये शिकतात.
शाळा सुटल्यावर तेरेसा द ओशन ऑफ ह्युमॅनिटी फाऊंडेशनमध्ये त्यांना दररोज संस्कार दिले जातात...बघता बघता प्रिन्सकुमार, पायल आणि या मुलांमध्ये एक भावनिक नातं निर्माण झालंय. जे रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक घट्ट आणि श्रेष्ठ आहे.