मुंबई गँगरेप : साक्ष देतानाच `ती`ची शुद्ध हरपली!

मुंबई गँगरेप प्रकरणाच्या आजच्या सुनावणीत पीडित फोटोजर्नलिस्ट तरुणीनं आरोपींना ओळखलंय. चार तास पीडित तरुणीची साक्ष सुरू होती. परंतु...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 17, 2013, 11:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई गँगरेप प्रकरणाच्या आजच्या सुनावणीत पीडित फोटोजर्नलिस्ट तरुणीनं आरोपींना ओळखलंय. चार तास पीडित तरुणीची साक्ष सुरू होती. परंतु, यावेळी ती साक्ष देतादेताच बेशुद्ध पडली. त्यामुळे उपचारासाठी तिला पोलिसांनी लागलीच हॉस्पीटलमध्ये हलवलं.
लोअर परेल इथल्या शक्ती मिल गँगरेप प्रकरणी बुधवारी, पीडित तरुणीच्या आईची साक्ष नोंदवण्यात आली होती. यानंतर आज २३ वर्षीय फोटोजर्नलिस्ट तरुणीची साक्ष नोंदवण्याचं काम सुरु होतं. यावेळी तिची आईही तिच्यासोबत उपस्थित होती. चार तास सोक्ष नोंदवणं सुरु होतं पण, अचानक तणावामुळे या तरुणीची शुद्ध हरपली. त्यामुळे तिला वैद्यकीय उपचार देण्याची विनंती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टाला केली. या प्रकरणात ‘इन कॅमेर’साक्ष नोंदवण्यात आल्यातनं कोर्टात पत्रकार व इतरांना मनाई करण्यात आली होती.
‘आज साक्ष देताना या तरुणीनं पूर्ण आत्मविश्वासाने साक्ष दिली... झालेला सगळा घटनाक्रमही तिनं कथन केला... पोलिसांपुढे दिलेल्या जबाबातील तपशिलाला दुजोरा दिला. आरोपींनी तिला दाखविलेली पॉर्न क्लिपही तिने ओळखली’ अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांना दिली.

दोन महिन्यांपूर्वी महालक्ष्मी इथल्या शक्ती मिलमध्ये पत्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. सगळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी सुरू आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.