www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई गँगरेप प्रकरणातला पाचपैकी एक आरोपी अल्पवयीन असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आरोपीच्या भावानं दिलेल्या शाळेच्या दाखल्याच्या आधारे या आरोपीला जुवेनाईल कोर्टात सादर करण्यात आले. तिथून डोंगरीच्या बालसुधारगृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे.
या आरोपीचं खरं वय ठरवण्यासाठी हाडांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तसंच त्याच्या नातलगांनी सादर केलेल्या जन्मदाखल्याची शहानिशा पालिका अधिकारी करत आहेत. त्याच्या नातलगांनी नायर हॉस्पिटलचा दाखला दिला असून त्यामध्ये त्याचं वय १६ वर्ष ६ महिने दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आता वैद्यकीय तपासणीवरच पोलिसांच्या आशा अवलंबून आहेत.
हे पुरावे त्याच्याविरुद्ध गेल्यास त्याची अन्य आरोपींसोबत चौकशी आणि त्यांच्याइतकीच शिक्षा होऊ शकेल. याबाबत पोलीस आशावादी असले, तरी सध्याच्या स्थितीत हा आरोपी सुटण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे.
शक्ती मील कंपाऊंडमध्ये २२ ऑगस्टला संध्याकाळी मुंबईत महिला फोटोग्राफऱवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर पोलिसांनी पाचही आरोपींची स्केच जारी करण्यात आली होती. त्यानंतर एकाला अटक केल्यानंतर त्याच्या माहितीच्याद्वारे पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. या पाचही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठोठावली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.