www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पुन्हा एकदा पहाटेच्यावेळीच मुंबई हादरली. डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळची बाबू गेनू मंडई इमारत कोसळली. ही इमारत महापालिकेच्या रहिवाशांचीच होती. महत्त्वाचं म्हणजे या इमारतीच्या पुनर्विकासाचाही प्रस्ताव होता. त्यासाठी विकासक विलास बोराडे यांचे प्रयत्न सुरू होते. पण महापालिकेच्या अधिका-यांनी पैशांच्या मागणीसाठी फाईल दाबून ठेवली असा आरोप विकासकाचा आहे.
चार मजल्यांच्या या इमारतीत २५ कुटुंब वस्तीला होती. या इमारतीची अनेकवेळा दुरुस्ती झाली होती. इमारत धोकादायक असल्याची माहिती पालिका प्रशासनाला दिली. पण प्रशासकीय अधिका-यांच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप नगरसेविका यामिनी जाधव यांनी केला आहे. त्यामुळे विकासाच्या आरोपात तथ्य असल्याची चर्चा सुरू आहे.
प्रशासकीय अधिकारी नगरसेवकांना जुमानत नसल्याच्या प्रश्नावर महापौरांनी सोयीस्करपणे बोलायचं टाळले आहे. इमारत पडून लोकांचा बळी गेल्यावर आरोप-प्रत्यारोपांचं आणि जबाबदारी ढकलाढकलीचं असं राजकारण रंगलं होतं. दुसरीकडे एनडीआरएफचे ३०० पेक्षा जास्त जवान, अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.