www.24taas.com, मुंबई
गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेले राम कदम आता काशी यात्रेला गेले आहेत. सुरूवातील मनसेच्या वर्धापनदिनी अनुपस्थित राहून चीनला गेलेले मनसेचे नाम’चीन’ आमदार नंतर पीएसआयला मारहाणी प्रकरणी विधीमंडळातून निलंबित झाले. आता ते काशी यात्रेला चालल्याने अजित पवारांप्रमाणेच ते आत्मक्लेश करण्यासाठी काशीला चालले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
आज बॅण्ड बाजासह फुलं उधळत राम कदम यांनी मिरवणूक काढली. ते कुठे विजयी झाले नाही की कुठे बाजी मारली नाही, तर ते चालले आहे काशीला. पोलीस मारहाण प्रकरणात कोठडीची हवा खाऊन आलेले राम कदम आता अडीच हजार वृद्धांचे श्रावण बाळ बनून काशीयात्रेला निघालेत....
अलिकडच्या काही प्रकरणांनी बदनामी ओढवून घेतल्यानंतर मतदारसंघातल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत काशीयात्रा घडवून पुण्य पदरात पाडून घेण्याचा राम कदमांचा हा प्रयत्न असावा.... अर्थात वर्षभरानंतर होणाऱ्या निवडणुकीचं गणितही त्यात असेलही, पण यात्रेकरूंसाठी ते श्रावणबाळच आहेत....
राम कदमांच्या काशीयात्रेसाठी कुर्ला टर्मिनसवरून खास रेल्वे बुक करण्यात आली होती. त्याची जय्यत तयारीही करण्यात आली होती.... पण एरवी मीडियासमोर जाणारे राम कदम यावेळी मात्र कॅमेऱ्यासमोर आले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावतीनं किल्ला लढवण्याची जबाबदारी मनसे नेते बाळा नांदगावकरांवर आली....
या काशीयात्रेसाठी रेल्वेचा खर्च म्हणून २३ लाख रुपये मोजावे लागले.... याशिवाय अडीच हजार लोकांचा खाण्याजेवण्याचा आणि राहण्याचा खर्च पाहता ही यात्रा राम कदमांना ५० लाख रुपयांना तरी पडेल.... एवढा खर्च कसा करणार हे राम कदमांनाच माहीत.... खरं तर राम कदम किर्तन-प्रवचनही ठोकतात.... पण अलिकडच्या काही घटनांनी त्यांची हभप ही प्रतिमा धुळीला मिळाली... आता पन्नाशेक लाखांची काशीयात्रा केल्यानंतर पापक्षालन होईल अशी राम कदमांची धारणा असावी.....