www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसेतून बाहेर पडलेले कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेच्या दसऱा मेळाव्यात जाधव सेनेत प्रवेश करतील. यासंदर्भात आज जाधव यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
यापूर्वी हर्षवर्धन जाधव यांनी मनसेतून बाहेर पडल्यावर मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर जाहीर टीका केली होती. मनसे म्हणजे नवनिर्माण नाही तर भ्रमनिरास असल्याची टीका त्यांनी केली होती. तसंच राज ठाकरेंना जॉनी वॉकरची उपमा देत राज ठाकरेंचं इंजिन दोन पेग प्यायल्याशिवाय चालतच नाही अशी जहरी टीकाही त्यांनी केली होती. आपल्यासाठी सर्व पक्षांची दारं उघडी असल्याचं जाधव यापूर्वी म्हणाले होते. मात्र ते नेमका कुठल्या पक्षात प्रवेश करणार याबद्दल कुठलीही माहिती त्यांनी दिली नव्हती.
२०१३ या वर्षाच्या सुरूवातीलाच कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेला जय महाराष्ट्र म्हटलं होतं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाधव यांना राजीनामा देऊ नका, असा आग्रह केला होता. या घटनेमुळे या राजीनाम्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. तसंच, हर्षवर्धन जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता दिसत होती. मात्र आता हर्षवर्धन जाधव शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.