मनसेमुळे शिवसेनेचे १४ उमेदवार पराभूत

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सातच नगरसेवक आले तरी मनसेकडे मते वळल्याने शिवसेनेचे किमान १४ नगरसेवक या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यात १२ ठिकाणी भाजपचे आणि दोन ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले.

Updated: Feb 27, 2017, 11:05 PM IST
मनसेमुळे शिवसेनेचे १४ उमेदवार पराभूत  title=

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सातच नगरसेवक आले तरी मनसेकडे मते वळल्याने शिवसेनेचे किमान १४ नगरसेवक या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यात १२ ठिकाणी भाजपचे आणि दोन ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले.

मनसे मतदान टक्केवारी घटली

गेल्या महानगरपालिका निवडणुकीत २२३ जागांवर उमेदवार देऊन मनसेने एकूण मतांपैकी २० टक्के मते पदरात पाडून घेतली होती. यावेळी मनसेला केवळ ८ टक्के मते पडली आणि सात नगरसेवक निवडून आले. शिवसेनेला २८ टक्क्य़ांहून अधिक मते मिळाली असली तरी मराठीबहुल प्रभागात मनसेच्या उमेदवारांकडे वळलेल्या मतांमुळे सेनेच्या उमेदवारांवर घाम फुटण्याची वेळ आली. यावेळी सर्वच पक्ष वेगवेगळे लढत असल्याने मतांची विभागणी होणे साहजिक होते. सेना-भाजप युती व कांग्रेस-राष्ट्रवादी आघाडी वेगळी लढत असल्याने या दोघांना एकमेकांच्या मतदारांचा होणारा फायदाही यावेळी झाला नाही. मात्र सेना व मनसे मराठी अस्मितेच्या मुद्दय़ावर लढत असल्याने या दोन्ही पक्षांमध्ये मतविभाजन होऊन भाजपला फायदा होण्याची शक्यता निवडणुकीपूर्वीही वर्तवण्यात आली होती.

शिवसेना-मनसे एकत्र असते तर...

मनसेचा प्रभाव ओसरला असला तरी मराठी पट्टय़ात, त्यातही पूर्व उपनगरात यावेळीही मनसेच्या उमेदवारांना भरभरून मते मिळाली. शहरातील किमान १४ प्रभागांमध्ये सेना आणि मनसेची एकत्रित मते ही विजयी उमेदवारापेक्षा अधिक आहेत.

मुलुंडमध्ये चित्र वेगळं असत

मुलुंडमध्ये सहाही जागा जिंकून आणण्याचा पराक्रम करणाऱ्या भाजपला मनसेचीच अप्रत्यक्ष मदत मिळाली आहे. प्रभाग क्रमांक १०५ मध्ये सेनेच्या उमेदवाराला ८३८५ तर मनसेच्या उमेदवाराला ३३७६ मते मिळाली. याठिकाणी विजयी झालेल्या भाजपच्या रजनी केणी यांनी ९८६६ मते पडली. 

प्रभाग १०६ मध्ये सेनेला ४८४१ तर मनसेला ३१४२ मते मिळाली तर भाजपच्या प्रभाकर शिंदे हे ६८१८ मतांनी निवडून आले. काँग्रेसलाही दोन ठिकाणी या मतविभाजनाचा फायदा मिळाला. या ठिकाणी सेना आणि मनसेची एकत्रित मते ७ हजाराहून अधिक आहेत तर काँग्रेसच्या आशा कोपरकर यांना ५१७४ मते मिळून त्या विजयी ठरल्या.

सेनेचा घाम फुटला

शिवसेनेचे नगरसेवक विजयी ठरलेल्या किमान २० ठिकाणी ही लढत अटीतटीची करण्यासाठीही मनसेचा वाटा आहे. सेनेच्या अनेक दिग्गजांना या मतफुटीमुळे घाम फुटला होता. मतविभाजनातून निकाल बदलण्याचा प्रकार अनेकदा होत असला तरी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत एका एका जागेसाठी समीकरणे मांडणाऱ्या सेनेला मनसेने असाही धक्का दिला आहे. 

कुठे पडला प्रभाव

मनसे व शिवसेनेची एकूण मते भाजपपेक्षा अधिक असलेले प्रभाग ९, २६, ३७, ५२, ५८, ८४, १०५, १०६, १११, १४४, १४९, १९० 

मनसे व शिवसेनेची एकूण मते काँग्रेसपेक्षा अधिक असलेले प्रभाग ११०, १४१