`मनसे टाळी`, ‘शुकऽ शुकऽ’ थांबवा.. सेनेने सुनावले

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीत यावे असे रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी त्यांच्या जाहीर भाषणात म्हंटले होते.

Updated: May 28, 2013, 10:40 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीत यावे असे रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी त्यांच्या जाहीर भाषणात म्हंटले होते. `दोघांच्या टाळी देण्याच्या मध्ये मी उभा होतो. मात्र आता मी बाजूला झालेलो आहे. त्यांनी आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांनी एकमेकांना टाळी द्यावी.` असं म्हणत आठवले यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचा एकत्र येण्याबाबत चर्चा घडवून आणली आहे. यालाच आज शिवसेनेचे मुखपत्र `सामना`मधून उत्तर देण्यात आलं आहे. अग्रलेखातून आज शिवसेनेने आठवलेंसोबतच नितीन गडकरींनाही काही सल्ले दिले आहेत.
सामना अग्रलेखातील काही भाग :
`महाराष्ट्राच्या राजकारणात ‘टाळी’ला इतके महत्त्व येईल असे कधी वाटले नव्हते, पण शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीतील आमच्या मित्रवर्यांनी स्वत:ची राजकीय कामे सोडून आपल्या पक्ष कार्यालयात ‘टाळी-मृदुंगा’चे चाटे क्लासेस काढलेले दिसतात व क्लासेसला विद्यार्थी मिळत नसल्याने एका हाताने टाळी व दुसर्‍या हाताने मृदुंगावर थाप मारताना आम्ही पाहात आहोत. नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ आमचे मित्रवर्य रामदास आठवले यांनीही आपल्या विचारांचे अनार उडवले आहेत व ‘मनसे’ला महायुतीमध्ये आमंत्रण दिले आहे.`
भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलताना तर ठाकरेबंधूंना एकत्र आणणारच, असा विडाच उचलला. विडा उचलून उपयोग काय? विडा रंगावा लागतो, त्यात कात, चुना, सुपारी व गुलकंदाचे प्रमाणही नीट असावे लागते. उचलला विडा आणि टाकला तोंडात म्हणजे झाले असे होत नाही. पुन्हा विड्यात कुणी नशेबाज तमाकू आणि गुटखा वगैरे मिसळला असेल तर सर्व विडेकरी गरगरून पडतील व आजच्या ‘युती’लाच त्याचा फटका बसेल.
महाराष्ट्राचे राजकारण व जनमताचा रेटा आम्हालाही कळतो. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बेमुर्वतखोर कारभाराला जनता विटली आहे. जनतेला कॉंग्रेसचा पराभव करायचा आहे, परंतु जनतेला राज्यात बेचव खिचडी नको आहे. शिवशाहीचे स्थिर राज्य हवे आहे ते देण्याची कुवत शिवसेनाप्रणीत महायुतीत आहे. विश्‍वास ठेवा, आत्मविश्‍वास डचमळू देऊ नका. उगाच विडे उचलू नका. कामाला लागा आणि कार्यकर्त्यांना कामाला लावा. आम्ही काय म्हणतोय? ‘शुकऽ शुकऽ’ समजले का? चला, दरवाजे- खिडक्या उघड्याच आहेत. मोकळी हवा येऊ द्या.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.