www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या घरांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून डबल फ्लॅट घेतलेल्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
‘राजयोग’ आणि ‘आशीर्वाद’ या दोन्ही सोसायट्यांमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून देण्यात आलेल्या घरांबाबत म्हाडा आणि नगर विकास खात्याने प्रतिज्ञापत्र सादर केलं. या सोसायट्यांमध्ये काँग्रेसचे चरणजीतसिंह सप्रा आणि विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके यांच्या नावे दोन फ्लॅट्स आहेत. हे दोन्ही फ्लॅट्स ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.
कोण आहेत हे लाभधारक
आपल्या मालकीचं अगोदरच घर असतानाही मुख्यमंत्री कोट्यातून एक किंवा त्यापेक्षा जास्त घरं लाटण्यामध्ये सत्ताधारी पक्षातील मंत्री, आमदार, नोकरशहा इतकेच काय, विरोधी पक्षातील नेत्यांनाचाही समावेश आहे. यामध्ये...
* विधान सभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके आणि त्यांच्या पत्नी
* प्रकाश जावडेकर यांची दोन मुले
* एका बड्या शिवसेना नेत्याचे दोन साडू
* काँग्रेस नेते चंद्रकांत दामया यांची कन्या सोनलचा फ्लॅट असताना त्यांनीही `राजयोग`मध्ये फ्लॅट मिळवला.
* धर्मराव अत्राम यांची पत्नी स्नेहलता आणि मुलगी भाग्यश्री यांचे पुणे आणि मुंबईत फ्लॅट असून त्यांनीही `राजयोग`मध्ये फ्लॅट घेतला.
* उद्योग मंत्री नारायण राणे यांचे बंधू कल्याण आणि अशोक यांना मुंबई आणि पुण्यात कोट्यातील फ्लॅट मिळाले.
* शिर्डी संस्थानचे अध्यक्ष जयंत ससाणे, त्यांचे बंधू संजय आणि धनंजय, वडील मुरलीधर आणि आई रत्नमाला हे सगळेच लाभार्थी आहेत.
* जयप्रकाश छाजेड आणि त्यांचा मुलगा हिम्मतसिंग
* अबिद हसन मुश्रीफ आणि साजिद हसन मुश्रीफ
* शिवाजी कर्डीले आणि त्यांच्या पत्नी अलका
* चंद्रकांत छाजेड आणि त्यांची पत्नी निर्मला छाजेड यांना एकापेक्षा जास्त फ्लॅट देण्यात आले आहेत.
* श्रीधर पाटणकर आणि सतीश सरदेसाई या बांधकाम व्यावसायिकांना एकाच दिवशी पुण्यात प्रभात रोडवरील इमारतीत कोट्यात फ्लॅट मिळाले.
मालकीचे घर असताना राजकीय प्रभाव वापरून मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा जास्त फ्लॅट मिळवणाऱ्या लाभार्थींविरुद्ध पत्रकार केतन तिरोडकर यांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर न्या. अभय ओक यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. सरकारने कोर्टासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अनेक राजकीय नेत्यांची नावे समोर आली असून त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांचा समावेश आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.