म्हाडाच्या लॉटरीत नंबर लागला नाही; निराश होऊ नका...

Updated: Jun 26, 2014, 01:11 PM IST
म्हाडाच्या लॉटरीत नंबर लागला नाही; निराश होऊ नका... title=

 

मुंबई : पुढच्या वर्षी मुंबईत म्हाडाच्या 3,000 घरांसाठी लॉटरी निघणार आहे. यात मुंबईत एक हजार तर वसई-विरारमध्ये दोन हजार घरांसाठी लॉटरी निघणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे, या घरांची किंमत यंदापेक्षा ५० हजार ते ३ लाखांपर्यंत कमी करण्यात येणार आहे. तसंच सध्या एसआरए योजना राबवत असल्यामुळं आणखी २ ते ३ हजार घरं उपलब्ध होणार आहेत.

पुढच्या वर्षी लॉटरीमध्ये समावेश असणाऱ्या प्रकल्पावर सध्या काम सुरू असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश गवई यांनी दिलीय. बुधवारी, मुंबई व कोकण मंडळांच्या वतीने 2,641 घरांसाठी वांद्रेतील रंगशारदा सभागृहात लॉटरी काढण्यात आली. या वेळी त्यांनी भविष्यातील योजनांबाबत माहिती दिली.

मुंबईतील जुन्या व धोकादायक ट्रान्झिस्ट कॅम्प पाडून तिथे पक्की घरे बांधली जाणार आहेत. त्याशिवाय एसआरए योजनेंतर्गत म्हाडाच्या जागेतील नऊ प्रकल्प प्राधिकरण स्वत: राबविणार आहे. यातून सुमारे 1 हजार घरे, त्याचप्रमाणो कोकण मंडळाच्या अखत्यारीतील विरार-बोळिंजमधील गृहप्रकल्पातील, ठाण्यातील बाळकूम, चितळसर येथे 2 हजार घरे उपलब्ध होऊ शकतील. आगामी पाच वर्षांत जवळजवळ एक हजार घरं तयार करण्याचा म्हाडाचा प्रयत्न राहील. यासाठी म्हाडानं 5-6 हेक्टर खाजगी भूखंडही विकत घेतले आहेत.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.