www.24taas.com, मुंबई
मुंबईत मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरु होईपर्यंत वादाच्या भोवऱ्यात कायम रहाणार असं चिन्ह दिसत आहेत. असल्फा रोड स्टेशनच्या कामांत अडथळा आल्यानं मेट्रोचा पूर्ण मार्ग सुरू व्हायला विलंब होण्याची शक्यता आहे.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रो रेल्वे मार्गावर, मेट्रो रेल्वे ही सुरुवातीच्या काळात नियोजित अंतराच्या अर्धे अंतर म्हणजेच वर्सोवा ते एअरपोर्ट रोड या स्टेशन दरम्यान धावणार आहे. असल्फा रोड या मेट्रो रेल्वे स्टेशनचे काम पुढील काही महिने सुरु करणे शक्य नसल्याचं एमएमआरडीएचे आयुक्त राहुल अस्थाना यांनी स्पष्ट केलंय. असल्फा रोड स्टेशनच्या बाजूलाच एक महेश्वर मंदिर आहे. आणि हे धार्मिक स्थळ हटवल्याशिवाय रेल्वे स्टेशनच्या काम काही पुढे सरकणार नसल्याचं अस्थाना यांनी स्पष्ट केलंय. अंधेरीतही मेट्रो पुलाच्या उभारणीत पूर्वेकडील स्थानकाजवळच्या एका मंदिराचा अडथळा होता, मात्र आता हा प्रश्नध सुटल्याने अंधेरी रेल्वे रुळांवर पूल उभारण्याचा प्रश्ना मार्गी लागलाय.
एअरपोर्ट रोड स्टेशनजवळ मेट्रोचा मार्ग बदलण्याची ‘इंटर लिंकिंग’ व्यवस्था आहे. यामुळे मेट्रो रेल्वे सुरु झाल्यावर मेट्रोची धाव ही वर्सोवा ते एअरपोर्ट रोड स्टेशन अशी साधारण सहा किलोमीटरपर्यंत मर्यादित रहाणार आहे. तेव्हा प्रत्यक्ष मेट्रो रेल्वे सुरु झाल्यावर वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर असा मेट्रोचा पूर्ण मार्ग सुरु व्हायला काही दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘कदाचित मेट्रो रेल्वे आम्हाला टप्प्यांमध्ये सुरू करावी लागेल. पहिल्या टप्प्यात वर्सोवा ते विमानतळ रोड स्थानकपर्यंतची सेवा सुरू करता येईल का? याची चाचपणी आम्ही करीत आहोत` असं राहुल अस्थाना यांनी म्हटलंय.