www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातले निवासी डॉक्टरांनी संप मागं घेतला असला तरी मुंबईतल्या डॉक्टरांनी संप मागं घेतलेला नाही. मुंबई महापालिकेच्या 3 हॉस्पिटलमधील डॉक्टर संपावर ठाम आहेत. या हॉस्पिटलमधील 1200 डॉक्टर संपावर आहेत. या संपकरी डॉक्टरांवर मुंबई महापालिका काय़ कारवाई करते याकडं सर्वांचं लक्ष लागलयं. महापालिका प्रशासनानं कारवाईबाबतची भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही.
मार्डचा गेले चार दिवस सुरू असलेला संप राज्यभरात मागे घेण्यात आला असला, तरी मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन आणि नायर रुग्णालयांमध्ये अद्याप संप सुरू आहे. संप मागे घेण्याबाबत शिखर संघटना सेंट्रल मार्ड आणि बीएमसी मार्ड यांच्यात मदभेद असल्याचं स्पष्ट झालंय. राज्यात असलेल्या दुष्काळात रुग्णांचे अधिक हाल होऊ नयेत, यासाठी संप मागे घेण्यात आल्याचं सेंट्रल मार्डनं जाहीर केलंय. सरकारनं डॉक्टरांच्या काही मागण्याही मान्य केल्यात. बीएमसी मार्डच्या नेत्यांची वैद्यकीय शिक्षणमंत्री पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, डॉक्टरांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागानं महापालिकेलाही सूचना दिल्या आहेत. त्यामुळे BMC मार्डनं संप मागे न घेतल्यास या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याचा पर्याय महापालिकेकडे खुला असल्याचं मानलं जातंय.
नागपुरात कारवाई
संपावर असलेल्या निवासी डॉक्टरांवरील कारवाई नागपूरातून सुरू झालीये. नागपुरातल्या शासकीय रुग्णालयातल्या संपकरी डॉक्टरांना हॉस्टेल सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. गेल्या चार दिवसांपासून मुंबईसह अनेक शहरांमधल्या सरकारी रुग्णालयांमधले निवासी डॉक्टर संपावर असल्यानं रुग्णांचे अतोनात हाल होतायत.
रुग्णांचे हाल
संपामुळं रुग्णांचे हाल होत नसल्याचा दावा सरकार आणि संपकरी डॉक्टर करीत असले तरी परिस्थिती मात्र वेगळीच आहे. डॉक्टरांच्या संपामुळं रुग्ण अक्षरक्षः उघड्यावर आल्याचं चित्र आहे. पुण्यातली एक तरुणी शस्त्रक्रियेअभावी केईएम रुग्णालयाच्या आवारात दोन दिवसांपासून पडून आहे. समीना शेख असं या तरुणीचं नाव आहे.
एका अपघातात तिचा पाय कापला गेलाय. दुस-या एका शस्त्रक्रियेसाठी तिला पुण्यातून मुंबईत आणण्यात आलं. मात्र संपामुळं तिच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. एवढंच नाही तर तिला केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला. त्यामुळं तिला दोन दिवस केईएमच्या आवारात उघड्यावर काढावे लागले. झी 24 तासनं या तरुणीचं छायाचित्रण करण्यास सुरुवात केल्यानंतर रुग्णालय प्रशासन खडबडून जागं झालं. त्यांनी समीनाला तातडीनं रुग्णालयात दाखल करवून घेतलं.