Exclusive : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचा राजकीय सिनेमा

महाराष्ट्रातल्या ताज्या राजकीय घडामोडी पाहिल्या तर एखादा सिनेमा निघावा, एवढा मसाला त्यात नक्कीच आहे. विशेषतः भाजप आणि शिवसेनेच्या संबंधांवर तर नक्कीच सिनेमा निघेल. या राजकीयपटाचा एक ट्रेलर..

Updated: Nov 29, 2014, 11:03 PM IST
Exclusive : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचा राजकीय सिनेमा   title=

मुंबई : महाराष्ट्रातल्या ताज्या राजकीय घडामोडी पाहिल्या तर एखादा सिनेमा निघावा, एवढा मसाला त्यात नक्कीच आहे. विशेषतः भाजप आणि शिवसेनेच्या संबंधांवर तर नक्कीच सिनेमा निघेल. या राजकीयपटाचा एक ट्रेलर..

या सिनेमातली सगळी पात्रे राजकीय असून, ती जर ओळखीची वाटली तर तो निव्वळ योगायोग समजू नये...जुळून येती रेशीमगाठी....पुन्हा एकत्र सत्तेसाठी... या सिनेमाची कथा आहे ती महाराष्ट्रातली. मराठी मातीतली... सख्खा भावांप्रमाणे २५ वर्षे खांद्याला खांदा भिडवून काम करणाऱ्या दोन राजकीय पक्षांची. भाजप आणि शिवसेनेची. युतीतल्या हळुवार नात्यांची. ये बंधन तो प्यार का बंधन है... जन्मों का बंधन है...असंच काहीसं चित्र दिसत आहे.

पण विधानसभा निवडणुका जाहीर होतात. आणि या घट्ट नात्यामध्ये उभी फूट पडते. तू मोठा की मी मोठा, यावरून भांडण सुरू होतं. २५ वर्षांचा युतीचा बालेकिल्ला पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळतो. का आणि कशासाठी, हे आता सर्वांनाच ठाऊक आहे. कधीकाळचे जानी दोस्त, आता एकमेकांचे जानी दुश्मन बनतात.

उद्धव ठाकरे भाजपला संबोधतात ही अफझलखानाची फौजवाला. तर देवेंद्र फडणवीस यांनीही तसंच उत्तर दिलं, शिवाजीराजांच्या नावानं खंडणी वसुली सुरु आहे.

निवडणुका होतात. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून येतात. पण नियतीचा फेरा असा की, भाजपला स्पष्ट बहुमत मिळत नाही. सत्तेसाठी पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेला एकत्र यावं लागणार, असं विधीलिखित असतं.
मात्र त्याचवेळी कहाणीमध्ये ट्विस्ट येतो. इरसाल पवारकाकांची (शरद पवार) एन्ट्री होते. भाजपच्या सरकारला बाहेरून, बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा ते करतात. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल सांगतात, आम्ही स्थिर सरकारला कोणत्याही अटी विना पाठिंबा देत आहोत.

मग काय, सुंठीवाचून खोकला गेल्यानं भाजपवाले आनंदित होतात. तरीही बहुमत जमवण्याचं टेन्शन असतंच. तर पवारकाकांनी आपली बार्गेनिंग पॉवरच संपवून टाकली, म्हणून मातोश्रीवर चिडीचूप सन्नाटा पसरतो.

एव्हाना सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असतो, देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीची तयारी सुरू होते. दुसरीकडे जुन्या मित्राकडून बोलावणं येईल, म्हणून उद्धव ठाकरे वाट पाहात बसतात. पण बोलावणं काही येत नाही. कंटाळून तेच दिल्लीला आपले दूत धाडतात. तरीही भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीच. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला दीड तास उरला असताना, दिल्लीश्वरांचा फोन येतो आणि उद्धव ठाकरे वानखेडेच्या दिशेनं मोर्चा वळवतात. ये कहाँ आ गये हम... यू ही साथ चलते चलते, अशीच या सिनेमाची स्थिती दिसते.

फडणवीसांचं सरकार जोमानं कामाला सुरूवात करतं. आवाजी मतदानानं विश्वासमत (सर्व गुलदस्त्यात) मंजूर होतं. शिवसेनेला नाइलाजानं का होईना, विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावं लागतं. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी सेनेची कोंडी झालेली असते. मग सरकारला शिकवीन चांगलाच धडा, म्हणत शिवसेनेची अख्खी फौज दुष्काळाच्या दौ-यावर निघते. शेतक-याच्या बांधावर जाऊन त्याचे अश्रू पुसण्याचं काम सुरू होतं. पण त्यात शेतकऱ्यांबद्दलची कळकळ कमी आणि सरकारच्या विरोधातला जळफळाट जास्त असतो. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने टेकू काढला तर काय करायचं, असं भाजपच्या गोठात धस्स होतं. त्यामुळे आम्ही सेनेबरोबर चर्चा करतोय, असं दाखविण्याचा चंग बांधला जातो. भाजप सेनेशी गोडबोलून झुलवाझुलवीचा खेळ करत असल्याचं सध्या दिसत आहे. काहीही न देता, फुकटात पाठिंब्यासाठी दबाव वाढविण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे.
 
त्याचवेळी देहानं शिवसेना विरोधी बाकांवर असली तरी मनातली लाल दिव्याची आस सुटलेली नसते. नागपूर अधिवेशनाच्या तोंडावर आम्ही सरकारला जेरीला आणू शकतो, हा शिवसेनेचा बिटवीन द लाइन्स मेसेज भाजपपर्यंत अचूक पोहोचतो. पुन्हा एकदा चर्चेचं गु-हाळ सुरू होतं. शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याच्या हालचाली जोर धरू लागतात. पुन्हा चर्चा चर्चा आणि चर्चा. याचेच बाईट मीडियातून दिसत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात, पुन्हा चर्चेला सुरूवात करणार आहोत. तर उद्धव ठाकरे सांगतात, होईल तेव्हा बघू. अखेर महिनाभरानंतर भाजपचे नेते चर्चेसाठी मातोश्रीवर पोहोचतात. वाटाघाटींना ख-या अर्थानं पुन्हा एकदा सुरूवात होते. आता सर्व अपमान गिळून शिवसेना सत्तेत सहभागी होणार का? भाजप आणि शिवसेनेचं सूत पुन्हा एकदा जुळणार का..? आणि राजकारणातले करण-अर्जुन पुन्हा एकत्र येणार का...?  

भाजप-शिवसेनेच्या या सिनेमाचा पुढचा भाग अधिक रंजक असणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका... लवकरच येतोय... नवा सिक्वल. सत्तेसाठी कायपण...युती रिटर्न्स...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.