www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तीचं माहेर बिहारचं... पती आणि अडीच वर्षांच्या चिमुरड्यासोबत ती गुजरातला स्थायिक झालेली... माहेरच्यांना भेटण्यासाठी गेली आणि घरी परतताना अचानक गायब झाली. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जंग जंग पछाडलं... आणि जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला.
एक विवाहिता आपल्या अडीच वर्षांच्या मुलासोबत दादर रेल्वे स्थानकावरून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीनं दाखल केली होती. गुजरात येथील सिल्वासा येथे राहणारी ही महिला महिनाभरापूर्वी बिहारला तिच्या माहेरी गेली होती. १८ जानेवारीला ती बिहारहून सिल्वासा येथे येण्यासाठी निघाली होती. मात्र थेट ट्रेन नसल्याने ती दादरला उतरून पुन्हा सिल्वासा येथे जाणार होती. ठरल्याप्रमाणे, २० जानेवारी रोजी दादरला उतरुन तीनं पती रमजी पासवान याला फोनही केला. परंतु, त्या संध्याकाळी ती घरी पोहचली नाही.
आपल्या बायकोची आणि मुलाची काळजीनं घेरलेल्या रामजीनं याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली. सोबत लहान मुलगाही असल्यानं पोलिसांना प्रकरण गंभीरतेनं हाताळलं. त्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार करून स्थानकावरील सीसीटीव्हीतील चित्रण तपासले. मात्र त्यात ती महिला दिसत नसल्याने पोलिसांनी काही सहप्रवाशांचीही चौकशी केली.
पत्नीकडे मोबाईल नसल्याने तिनं तीन-चार वेळा एका मोबाईलवरून आपल्याला फोन केल्याचे पतीनं पोलिसांना सांगितलं होतं. पोलिसांनी या मोबाईलचं लोकेशन तपासलं असता तो मोबाईल बंगळुरू इथं असल्याचं समजलं. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल मालकाला अटक केली. त्याच्यासोबतच आपल्या मर्जीन पळून गेलेल्या या महिला आणि मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.
यानंतर, महिलेने आपण पतीची फसवणूक केल्याचा जबाब पोलिसांना दिला. मर्जीने प्रियकरासोबत गेल्याने पोलिसांनी तिची आणि तिच्या प्रियकराची समजूत घालून त्यांना सोडून दिलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.