www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
'कालनिर्णय' कॅलेंडरच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेल्या ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचं आज पहाटे हिंदुजा रुग्णालयात निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. आज दुपारी तीनच्या सुमारास दादर इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
साळगावकर यांची प्रकृती खालावल्यानं मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे सव्वापाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी दुपारी त्यांची प्रकृती एकदम खालावल्यानं अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडं असा परिवार आहे. दुपारी दादर इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जयंत साळगावकर हे सर्वाधिक खपाच्या `कालनिर्णय` या कॅलेंडरचे संस्थापक आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये १ फेब्रुवारी १९२९ रोजी त्यांचा जन्म झाला. जयंत शिवराम साळगावकर हे त्यांचं पूर्ण नाव. साळगावकरांनी ज्योतिष, पंचांग आणि धर्मशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. मॅट्रिकपर्यंत संस्कृतचं परंपरागत शिक्षण घेतलेल्या साळगांवकरांनी पंचांग आणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून कालनिर्णय ही नऊ भाषांतून प्रसिद्ध होणारी दिनदर्शिका प्रसिद्ध केली.
सोमवारी साळगावकर यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते चिंतेत होते. साळगावकर हे महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सल्लागार होते. तसंच मराठी व्यापारी मित्रमंडळाचे सर्वेसर्वा म्हणूनही त्यांची ओळख होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.