मुंबई : भंडारामधील उमरेडच्या अभयारण्यातून बेपत्ता झालेल्या जय वाघाचा शोध सुरू असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. भंडाऱ्यात अटक करण्यात आलेल्यांना दुस-या प्रकरणात जेरबंद करण्यात आल्याचा खुलासा मुनगंटीवारांनी केला आहे.
जय वाघाच्या शोधासाठी कॅमेरा ट्रॅप यंत्रणा स्थापित करण्यात आली आहे. आज विविध माध्यमात आलेल्या बातम्या असत्य आणि अफवा असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे २ आरोपीना जयच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आल्याची बातमी काही माध्यमात आली आहे.
मात्र, या दोन आरोपीना अन्य एका प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याचा जय वाघ प्रकरणाशी संबंध नसल्याचे वनमंत्री म्हणाले. जयच्या शोधासाठी वनविभाग प्रयत्नशील असून जय याआधीही अनेक वेळा ३-३ महिने बाहेर राहिला आहे. भंडारा जिल्ह्यातील ग्रामस्थानी जय ला बघितले आहे. सध्या याबाबतीत अफवा पसरविली जात असल्याचे वनमंत्री म्हणाले.