कृष्णात पाटील, मुंबई : लग्न न करताच आणि कुठल्याही महिलेशी संबंध न ठेवता एका मुलाचा बाप झालेल्या अभिनेता तुषार कपूरच्या निमित्तानं 'सिंगल पॅरेंटस'चा विषय चर्चेत आलाय.
विज्ञानाच्या मदतीनं हे शक्य झालंय खरं पण यामुळे देशात पूर्वापार चालत आलेल्या विवाहसंस्थेला बसलेला हा धक्का तर नाही? की या संकल्पनांचा स्वीकार करण्याएवढी समज समाजाला आलीय?
लग्नानंतरच मुलं जन्माला घालणं... ते लग्नही पुरूष आणि स्त्रीमध्येच व्हायला हवं... पण, यापैंकी अभिनेता तुषार कपूरला काहीच करायचं नव्हतं, पण त्याला हवं होतं स्वत:च मूल... यावेळी त्याच्या मदतीला आलं ते नवं तंत्रज्ञान आयव्हीएफ आणि सरोगसी...
तुषार कपूरचे शुक्राणू आणि एका अज्ञात महिलेने डोनेट केलेले स्त्रीबीज घेऊन 'आयव्हीएफ'च्या माध्यमातून ते फलित करण्यात आले. त्यानंतर ते 'सरोगेट मदर'च्या गर्भाशयात ठेवण्यात आले. या माध्यमातून जे मुलं जन्माला आले, ते आता कपूर खानदानाचा वारसदार ठरलंय. या सर्व प्रक्रियेत 'बाई' आहे, पण 'आई' कुठंच नाहीय. असणाराय तो केवळ 'बाप माणूस'...
पूर्वी काहीसा विरोध असलेल्या गे, लेस्बियन, लिव्ह इन रिलेशनशिप यांसारख्या संकल्पना आता भारतात रूजू लागल्यात. त्यांच्या हक्कांसाठीच्या लढाईला पाठिंबाही वाढतोय. त्यामुळे आईविना किंवा वडिलांविना मुलं ही सिंगल पेरेंट्सची संकल्पना भारतीय मानसिकतेत न बसणारी असली तरी ती स्वीकारली जातीय. आत्तापर्यंत सिंगल पेरेंट्सचा विषय विधवा, परितक्त्यापर्यंतच मर्यादीत होता, जो परिस्थितीमुळं लादला गेला होता. परंतु इथं मात्र स्वेच्छेने सिंगल पेरेंट्स स्विकारले आहे, असं सामाजिक अभ्यासक शारदा साठे सांगतात.
मुलं कुठल्याही माध्यमातून जन्माला आले तरी त्याला त्याचे हक्क मिळायला हवेतच. परंतु तुषार कपूर प्रकरणात मुलाला आईचे प्रेम मिळवण्याचा हक्क डावलला जात नाही का? असा प्रश्नही उपस्थित होतो.