मुंबई : ISIS या दहशतवादी संघटनेने सोशल मीडियावर चांगलेचे हातपाय पसरलेत. संघटनेच्या प्रचारासाठी आणि तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी त्यांनी थेट इंटरनेटवर पुस्तक उपलब्ध केले आहे.
'मुस्लीम गँग्ज, द फ्यूचर ऑफ मुस्लिम्स इन द वेस्ट' असं या पुस्तकाचं नाव आहे. ISISच्या या घुसघोरीचा पोलीस यंत्रणेनं धसका घेतलाय. मुंबई पोलिसांच्या दहशतवादी पथकानं हे पुस्तक इंटरनेटवरुन हटवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केलेत.
अधिक वाचा : पुणे हादरलं... अवघ्या १६ वर्षांची मुलगी आयसिसच्या जाळ्यात!
या पुस्तकात ISISची धोरणे आहेत. अवघ्या ४५ पानांच्या या पुस्तकात तरुणांची माथी भडकवणारी माहिती आहे. धर्माच्या नावावर संघटीत कसे करावे, देशविरोधी कारवायांसाठी कसे सज्ज करावे, घातक शस्त्रास्त्रे, मानवी बॉम्ब कसे बनावे, याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे हे पुस्तक पोलिसांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरु शकते, अशी चर्चा आहे.
अमेरिका तसंच युरोपीयन देशांनी ISISच्या नाड्या आवळल्या आहेत. त्यामुळं ISISनं संघटनावाढीसाठी आता भारताकडे मोर्चा वळवलाय. या पुस्तकात अबू बक्र अल बगदादी, ओसामा बिन लादेश यासारख्या दशहतवाद्यांचा उदोउदो केलाय. हे पुस्तक देशविघातक असल्यान इंटेरनेटवर दिसू नये, यासाठी एटीएसने सायबर पोलिसांना पत्र दिले आहे.