शालेय मुलींच्या लैंगिक अत्याचारांमध्ये वाढ

मुंबईत छेडछाडीच्या घटना वाढत असताना शाळेतल्या विद्यार्थीनींवर होणारे लैंगिक अत्याचार आणि छेडछाडीचे प्रमाणदेखील वाढत चाललंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 29, 2013, 07:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होत असताना अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत चालली आहे. अशा घटना रोखण्यासाठी आता स्वयंसेवी संघटना पुढे येतायत मात्र, शाळा प्रशासन आणि पालकांनीदेखील सतर्क राहण्याची गरज आहे. मुंबईत छेडछाडीच्या घटना वाढत असताना शाळेतल्या विद्यार्थीनींवर होणारे लैंगिक अत्याचार आणि छेडछाडीचे प्रमाणदेखील वाढत चाललंय.
चाईल्डलाइन या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार कोणत्याही वेळी 10 पैकी एका मुलीशी लैंगिक गैरवर्तणूक होते. दर 13 तासांत 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार होतो. 2012 मध्ये 894 लैंगिक अत्याचाराच्या घटनांपैकी 756 घटना या मुलींसोबत झालेल्या आहेत. त्यातील 222 केसेसमध्ये शेजा-यांकडूनच अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
मुलींवरचे हे आत्याचार रोखण्यासाठी शाळांमध्ये सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श याबाबत कार्यशाळा घेतली जातेय. पालिका तसंच अन्य शाळांमध्ये काही क्लिपिंग्सद्वाराही जनजागृती केली जातेय. अशावेळी पालक आणि शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी सकारात्मक संवाद असणे गरजेचं असल्याचं मानोसपचार तज्ञांचं म्हणणं आहे. मुलांना आधार द्या, जागरुक राहा, मुलाने स्पर्शाबाबत गैरवर्तणूक झाल्याचे सांगितले तर चिडू नका. अशा समस्यांकडे दुर्लक्ष करु नका. मुलाच्या उपस्थितीत गैरवर्तणूक करणा-यास समज देऊ नका. लैंगिक अत्याचार झाला असेल तर वैद्यकीय तपासणी जरुर करा. घटनेची तक्रार नोंदवण्यासाठी शाळेतील अधिकारी किंवा पोलिसांशी जरुर संपर्क साधा
लहान वयोगटातल्या मुलींशी छेडछाड झाल्यानंतर त्यांची मानसिक अवस्था समजून घेऊन त्यांना भविष्य़ासाठी तयार करणे ही समाजाची जबाबदारी आहेच. पण अशा घटना रोखण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी पुढे येऊन मुलांना जागरुक करण्यासोबतच अशा घटनांची तक्रार करणेदेखील आता गरजेचे बनले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.