दीपक भातुसेसह सागर कुलकर्णी, झी मीडीया मुंबई : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी लवकरच निवडणूक होणाराय... या निवडणुकीत दहाव्या जागेसाठी कोण उमेदवार उभा करणार? काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडील अतिरिक्त मतं कुणाच्या पारड्यात पडणार, ते महत्त्वाचं ठरणाराय...
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणुकीचं बिगूल वाजलंय... एकीकडं महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्येच वाघ विरूद्ध सिंह असा सामना रंगलाय... तर दुसरीकडं काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही दहाव्या जागेवरून वादाची ठिणगी पडलीय...
काँग्रेसला विनंती दोन उमेदवार आमचे असू द्या, पुढीलवेळेस आम्ही मदत त्यांना करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
२८८ आमदार मतदार असल्यानं विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला २७ मतं मिळवावी लागणार आहेत.
भाजपचे १२४ आमदार, इतर छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीनं भाजपचे ५ आमदार सहज जिंकतील.
शिवसेनेच्या ६२ संख्याबळावर दोन जागा सहज येतील.
काँग्रेसकडे ४२ आणि राष्ट्रवादीकडे ४१ मतं असल्यानं त्यांचा प्रत्येकी एक उमेदवार सहज विजयी होईल.
काँग्रेस-राष्ट्रवादीनं सहमतीनं तिसरा उमेदवार दिला तर तोही निवडून येईल.
मात्र दोन्ही पक्षांनी दोन दोन उमेदवार उभे केले तर मात्र अडचणी वाढतील.
अशावेळी शिवसेनेकडची अतिरिक्त मतं निर्णायक ठरणार आहेत.
वाघ सिंहासोबतची मैत्री निभावणार का, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय...
काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या वादाचा फटका दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत घोडेबाजार तेजीत येईल, असं सांगितलं जातंय. शिवसेनेला ठाणे विधान परिषद जिंकायचीय, तर भाजपला वरिष्ठ सभागृहातलं संख्याबळ वाढवायचंय. त्यामुळं सत्तेच्या सारीपाटात ही निवडणूक सर्वांसाठीच महत्त्वाची ठरणाराय