...अशा 'सेक्स'ला बलात्कार मानणार नाही- कोर्ट

प्रेमाच्या भानगडीत `तिचं` पाऊल वाकडं-तिकडं पडलं आणि नंतर प्रेमप्रकरण फसलं तर बलात्कार झाल्याचा आरोप संबंधित मुलीला करता येणार नाही.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 13, 2013, 04:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
प्रेमाच्या भानगडीत `तिचं` पाऊल वाकडं-तिकडं पडलं आणि नंतर प्रेमप्रकरण फसलं तर बलात्कार झाल्याचा आरोप संबंधित मुलीला करता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने तसा महत्त्वपूर्ण निकाल देत एका आरोपीला बलात्काराच्या आरोपातून मुक्त केलं आहे.
बोरिवलीतील महेश कोटियन यांच्या विरोधात एका महिलेने केलेल्या आरोपाच्या प्रकरणी न्यायालयाने हा निकाल दिला. तक्रारदार महिलेचे महेश कोटियनशी अफेअर होते. ती त्याच्यावर भाळली होती. तिला त्याच्याशी लग्नही करायचे होते. या जवळीकीतून एक दिवस ते दोघे गोराई येथील एका हॉटेलात भेटले. तिथे त्यांच्यात शरीरसंबंध आला. त्यातून ती गरोदर राहिली. पण नंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याने तिने महेशविरोधात बलात्काराची तक्रार केली होती. याप्रकरणी सत्र न्यायालयाने २०१२ साली कोटियनला सात वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीनंतर न्या. जाधव यांनी महेशला बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. `तक्रारदार महिला शिकली-सवरलेली आहे. हॉटेलात गेल्यावर तिथे काय होऊ शकते याची पूर्ण कल्पना तिला होती. शिवाय तिथे जे काही झाले, त्याला तिने अजिबात प्रतिकार केला नाही. मदतीसाठी कोणाचाही धावा केला नाही. तसा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे तिच्यावर बळजबरी किंवा बलात्कार झाल्याचे सिद्ध होत नाही,` असे न्यायालयाने स्पष्ट केले.
त्याचवेळी, आपण विवाहित असून आपल्याला मुले आहेत हे कोटियनने संबंधित महिलेपासून लपवल्याने त्याच्यावर न्यायालयाने फसवणुकीचा ठपका ठेवला. मात्र, त्याने आधीच तीन वर्षांचा तुरुंगवास भोगल्याने त्याची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.