पावसा, जरा दमानं..

पावसानं मुंबईकरांना सोमवारी चांगलच झोडपलं. मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवातच झाली ती पावसाच्या सरींबरोबर. दिवसभर पावसानं मुंबईकरांना असा काही इंगा दाखवला की आधी ‘येरे येरे पावसा’ म्हणायला लावणा-या पावसानं आज मात्र ‘पावसा जरा दमानं’ असंच म्हणायला लावलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 4, 2012, 07:35 AM IST

www.24taas.com, मुंबई
पावसानं मुंबईकरांना सोमवारी चांगलच झोडपलं. मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवातच झाली ती पावसाच्या सरींबरोबर. दिवसभर पावसानं मुंबईकरांना असा काही इंगा दाखवला की आधी ‘येरे येरे पावसा’ म्हणायला लावणा-या पावसानं आज मात्र ‘पावसा जरा दमानं’ असंच म्हणायला लावलं.

जून, जुलै आणि ऑगस्ट कोरडाठाक गेला आणि सप्टेंबर सुरू होताच पावसाला जाग आली. सप्टेंबर उजाडताच पाऊस कोसळला तो तीन महिन्यांतला बॅकलॉग भरुन काढायचा असा निश्चय करुनच... मुंबईकरांची आठवड्याची सुरुवातच झाली ती ढगांच्या गडगडाटानं आणि विजांच्या कडकडाटानं... दिवस उजाडला तोच पावसाच्या रिपरिपीनं. सकाळीच मुंबईतल्या सखल भागांत पाणी साचायला सुरुवात झाली. सायन, कुर्ला, हिंदमाता, अंधेरी, मालाड सबवे, गोरेगाव, साकीनाका, मिलन सबवे परिसरात पाणी साचलं. ठाण्याच्या राम मारूती रोड, वंदना टॉकीज, नौपाडा, वसंत विहार, कोपरी परिसरात पाणी साचलं. पावसाच्या तडाख्यामुळे तिन्ही मार्गांवरच्या रेल्वेंचा वेगही मंदावला. दुपारपर्यंत पावसाची उघडझाप सुरू होती. पण संध्याकाळी पावसानं पुन्हा दमदार कमबॅक केलं.
सांताक्रुझचा मिलन सबवे पाण्यानं पूर्ण भरुन गेला. सबवेमध्ये वाहनं अडकून पडली. कंबरभर पाण्यातून मार्ग काढावा लागत होता. हिंदमाता परिसरातही प्रचंड पाणी साचलं. शहराच्या मुख्य भागात पाणी साचल्यानं वाहतुकीची पुरती कोंडी झाली. मुख्य रस्त्यांवरच्या वाहनांचा वेग मंदावला. बरीच वाहनं पाणी गेल्यानं बंद पडली. एलफिन्सटन स्टेशन, परेल आणि वरळी परिसरातही संध्याकाळी प्रचंड पाणी साचू लागलं. घरी परतणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. पाण्यातून कसाबसा मार्ग काढत चाकरमानी घऱाकडे निघाले होते. ठाण्यातही दिवसभर दमदार पाऊस झाला. रस्त्यावर प्रचंड पाणी साचल्यानं संध्याकाळी वाहतुकीची जबरदस्त कोंडी झाली होती. घोडबंदर रोड, एलबीएस मार्गावर वाहनांच्या एकामागोमाग रांगा लागल्या होत्या. ठाण्यातल्या ठाण्यात पोहोचण्यासाठी अडीच ते तीन तास लागत होते. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसानं मुंबईकरांची चांगलाच हिसका दाखवला.
या पावसामुळं महापालिकेचे नालेसफाईचे दावेही फोल ठरलेत. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे नालेसफाईची कामे कशा पद्धतीने झालीयेत. तेच यातून उघड झालंय.