मुंबई : मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे, येत्या २४ तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
मुंबईत ऑफिसच्या वेळेपर्यंत पावसाची संततधार सुरू असल्याने अनेकांना ऑफिस गाठण्यात उशीर झाला. दरम्यान पश्चिम आणि मध्य रेल्वेही पावसामुळे उशीराने धावत होती.
दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत जोरदार पाऊस पडत असून त्यामुळे शहराच्या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. यामध्ये दादर , हिंदमाता, भायखळा या विभागांचा समावेश आहे.
दोन्ही मार्गावर लोकल ट्रेन्स १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. रस्त्यावरदेखील पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी झालेली पहायला मिळत आहे.
महाराष्ट्रमध्ये दाखल झालेल्या पावसाची आता दिल्लीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. पुढच्या दोन दिवसात मान्सून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर दाखल होईल. शिवाय मान्सून दिल्लीपर्यंत पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.