बाप्पा गणेशमंडळांना पावलाय, खड्डयांबाबत मुंबई पालिका गप्प

गणपती मंडळांना महापालिकेनं खड्ड्यांसाठीची दंडवसुली माफ केलीय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि राजकीय पक्षही गप्प आहेत. त्यामुळे गणपती आले् काय आणि गेले काय. सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खड्ड्यांचं विघ्न कायम राहणार आहे.  

Updated: Aug 27, 2014, 12:24 PM IST
बाप्पा गणेशमंडळांना पावलाय, खड्डयांबाबत मुंबई पालिका गप्प title=

मुंबई : गणपती मंडळांना महापालिकेनं खड्ड्यांसाठीची दंडवसुली माफ केलीय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि राजकीय पक्षही गप्प आहेत. त्यामुळे गणपती आले् काय आणि गेले काय. सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खड्ड्यांचं विघ्न कायम राहणार आहे.  

मुंबईत गणपतीचं आगमन होण्याआधीच बाप्पा गणेशमंडळांना पावलाय. गणेश मंडळांनी रस्त्यांवर खोदलेले खड्डे हा दरवर्षीचा विषय. मुंबई महापालिका संबंधित मंडळांकडून या खड्ड्यांसाठी दंडाची आकारणीही करते. परंतु त्याची वसुली मात्र केली जात नाही. यंदा तर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका याबाबत कमालीची मवाळ झालीय.   

राजाच्या चरणी दरवर्षी कोट्यवधींचे दागिने आणि रोख रक्कम भक्त अर्पण करतात. परंतु लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं रस्त्यात खड्डे खोदल्याप्रकरणी केलेला 29 लाख रुपयांचा दंड दोन वर्षांपासून भरलेलाच नाही. लालबाग गणेशगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानंही पाच लाख रुपये भरले नाहीत. ही दोन उदाहरणं केवळ वाणगीदाखल. मुंबईत अशी शेकडो मोठी गणेश मंडळं आहेत, की ज्यांनी खड्डे खोदल्याप्रकरणी दंड भरलेला नाही आणि पालिकेनं हा दंड वसूल करण्यासाठी प्रयत्नही केले नाहीत. यावर्षी तर विधानसभा निवडणुका जवळ आल्यानं गणेश मंडळांबाबत मुंबई महापालिका कमालीचा सौम्यपणा दाखवत आहे.  

निवडणूक काळात गणेश मंडळांना नाराज न करण्याच्या धोरणाचा अवलंब सर्वच राजकीय पक्षांकडून केला जातोय. त्यामुळं मुंबई महापालिकेतील सत्ताधा-यांकडून गणेश मंडळांना पाठिशी घातलं जात असल्याचा आरोप केला जातोय.

गणेश मंडळांकडून रस्त्यांवर खड्डे खोदून मंडप तर घातले जातातच. शिवाय जाहिरातींचे फलक लावण्यासाठीही खड्डे खोदले जातात. परंतु ते भरले न गेल्यामुळं वाहनधारकांना त्रास होतो. गणेश मंडळं ही निवडणुकीतील व्होटबँक असल्यामुळं कुठलाही राजकीय पक्ष याविरोधात आवाज उठवताना दिसत नाही.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.