www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अहमदनगर जिल्ह्यातल्या दलित युवक हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिली. तर दोषींना कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेय.
अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्डा गावातील दलित युवकाच्या हत्या प्रकरणी सरकारला अखेर जाग आली आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याची माहिती गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिलीय. आंतरजातीय प्रेमप्रकरणातून नितीन आगे या दलित युवकाची सवर्णांनी गावात दिवसाढवळ्या निर्घृणपणे हत्या केली. एवढ्या गंभीर प्रकरणानंतरही सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीनं या गावात जाऊन पीडित कुटुंबियांची ना भेट घेतली ना कारवाईबाबत ठोस आश्वासन दिलं. त्यामुळं सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत होती.
तर दुसरीकडे नितीन आगेच्या खून प्रकरणी आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न करू असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणातल्या आरोपींना अटक झाली. पण एवढं क्रौर्य ज्यांच्या मुलाशी घडलं त्या कुटुंबिय़ांची भेट घेण्याचं सौजन्य अजूनही सरकारतर्फे कोणी दाखवलं नव्हतं.. त्याबाबत टीका झाल्यावर आता मुख्यमंत्री याविषयी बोललेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.