www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये झालेल्या चुकांच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना म्हणजेच मनविसेनं आंदोलन केलं. मनविसेच्या कार्यकर्त्यांनी गेटबाहेर पेपर सोडवून विद्यापीठाचा निषेध केला.
गेला महिनाभर मुंबई विद्यापीठाच्या एमए, एलएलबी , बीकॉम , बीएच्या परीक्षांमध्ये सुरू असलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसच्या गेटसमोर `प्रतीकात्मक परीक्षा` घेऊन अनोखे आंदोलन केले.
पेपरांमध्ये सातत्याने होणाऱ्या चुका, विद्यार्थ्यांच्या तक्रारीला दाद न देता चूक करणाऱ्या प्राध्यापकांना दिले जाणारे अभय अशा विविध घटनांचा निषेध म्हणून मनविसेने हे आंदोलन केले. यावेळी विद्यापीठाच्या गेटसमोर काही विद्यार्थ्यांना परीक्षार्थी म्हणून बसवण्यात आले आणि त्यांची प्रतीकात्मक परीक्षा घेण्यात आली.
मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर आणि सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी परीक्षा नियंत्रकांच्या कार्यालयास घेराव घातला. या आंदोलनाची दखल घेत प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र , प्रभारी परीक्षा नियंत्रक दीपक वसावे आणि नवनियुक्त परीक्षा नियंत्रक पद्मा देशमुख तसेच वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. मधु नायर यांनी मनविसेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली.यावेळी मनविसेच्या सर्व मागण्या विद्यापीठ प्रशासनाने मान्य केल्या असून , प्र डॉ. नरेशचंद्र यांनी दोषींना कारणे दाखवा नोटीस काढल्याचेही सांगितले.