मुंबई : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणाची चौकशी एसीबीकडे सोपवण्यात आली आल्याची माहिती राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिली. याप्रकरणी एफआयआर नोंदवून चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळं एकनाथ खडसेंसमोरील चौकशीचा ससेमीरा संपायला तयार नाही.
पारदर्शकता असावी यासाठी खडसेंविरोधातली तक्रार आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवत आहोत असे निवेदन राज्य सरकारचे मुंबई उच्च न्यायालयात दिलय. त्यावर एक आठवड्याच्या आत एकनाथ खडसेंविरोधात बंडगार्डन पोलिसांकडील हेमंत गावंडे यांची फौजदारी तक्रार एसीबीकडे हस्तांतरित करा आणि एफआयआर नोंदवून जलदगतीनं चौकशी सुरू करा, न्या. दिनकर झोटिंग आयोगाच्या अहवालाविना प्रभावित न होता स्वतंत्रपणे चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं एसीबी महाराष्ट्रच्या पोलीस उपअधीक्षकांना दिले आहेत.