ड्रग्स विकलं जातंय बॉलीवूड कलाकारांच्या नावाने

कोडवर्ड वापरून केली जातेय मृत्यूची तस्करी...

Updated: Dec 29, 2015, 05:52 PM IST
ड्रग्स विकलं जातंय बॉलीवूड कलाकारांच्या नावाने title=

मुंबई : मल्टिप्लेक्स बांद्र्यामध्ये आहे, तिथं बरेच पिक्चर लागलेत... तुम्हाला कोणता बघायचाय ? हा प्रश्न एखाद्यानं व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकवर विचारला तर सावधान... एक मोठा मृत्यूचा सापळा रचला जातोय... थर्टिफस्टच्या पार्ट्यांमध्ये तरुणाईला नशेच्या आहारी ढकलण्यासाठी कोडवर्ड वापरून मृत्यूची तस्करी केली जातेय...

सिनेस्टार्स आणि त्यांचे सिनेमे मायानगरी मुंबईच्या आणि मुंबईकरांच्या रक्तात भिनलेले. पण याच सिनेस्टार्सच्या नावाचं विष आता तरुणाईच्या रक्तामध्ये भिनवलं जातंय. यांच्या जवळ जायचं म्हणजे आयुष्याचा दी एंडच. 

थर्टीफस्टच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. मुंबई, गोव्यासह सर्वच मोठ्या शहरांमध्ये आणि गावागावात 2016चं जंगी स्वागत होणार आहे. त्यासाठी रंगारंग पार्ट्यांचं प्लॅनिंग केलं जातंय.

अशीच तयारी करतायत मृत्यूचे सौदागर. न्यू इयर पार्टी करणाऱ्या तरुणांची शिकार करण्यासाठी ते जाळं विणतायत. फेसबूक, ट्वीटर, व्हॉट्सअॅप, स्काईप, हाईक अशा सोशल नेटवर्किंगवर चॅटिंग करून अंमली पदार्थ विकण्याची त्यांची खटपट सुरू आहे. पण हे करताना पोलिसांनाही चकवा द्यायचा असतो. त्यासाठी वापरात आणले जातात नवनवे कोड-वर्ड्स.

थिएटर किंवा मल्टिप्लेक्सचा अर्थ आहे पार्टीचं स्थळ

फिल्म म्हणजे नशा

मेफोड्रोन याचं कोडनेम आहे मस्तानी. या अंमली पदार्थाला यंदा सर्वाधिक मागणी आहे. याची किंमत 200 रुपये प्रतिग्रॅमवरून आता थेट 2000 रुपये झालीये. 

सर्वात धोकादायक अशा हेरॉईनला नाव दिलं गेलंय दीपिका

सॉफ्ट ड्रिंकमध्ये मिसळून तरुणींची फसवणूक करणाऱ्या धोकादायक केटामाईन किंवा डेट-रेपला प्रियंका हे नाव ठेवण्यात आलंय. 

एलएसडी म्हणजे लिर्सजिक एडिस डाय एथिलेमाईड याला बाजीराव नावानं संबोधलं जातंय.

कोकेनला दीवानी
दिलवाले म्हणजे एक्स्टसी
आमिर म्हणजे रॉहिप्नॉल
शाहरूख किंवा मन्नत म्हणजे चरस

हे आणि यासारखे कोड क्रॅक करून मृत्यूच्या सौदागरांचा छडा लावणं हे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान असतं. त्यासाठी मुंबई पोलिसांना विशेष प्रशिक्षण दिलं जातंय. 31 डिसेंबरला सगळे जण नववर्ष स्वागताचा जल्लोष करत असताना मुंबई, महाराष्ट्र आणि गोव्याच्या पोलिसांची या मृत्यूच्या सौदागरांवर बारीक नजर असेल.