बाळासाहेब २००७ पासून आजारी होते : डॉ.जलील

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रावरील वादावर साक्ष देतांना, बाळासाहेबांचे खाजगी डॉक्टर जलील पारकर यांनी साक्ष नोंदवली आहे.

Updated: Apr 22, 2015, 05:09 PM IST
बाळासाहेब २००७ पासून आजारी होते : डॉ.जलील title=

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रावरील वादावर साक्ष देतांना, बाळासाहेबांचे खाजगी डॉक्टर जलील पारकर यांनी साक्ष नोंदवली आहे.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयात साक्ष नोंदतांना डॉक्टर जलील पारकर म्हणाले, बाळासाहेब हे २००७ पासूनच आजारी होते, बाळासाहेब जेव्हा कधी घराबाहेर जायचे, तेव्हा लिलावती रुग्णालयाचा विशेष मेडिकल स्टाफ त्यांच्यासोबतच असायचा, असंही डॉ. पारकर यांनी यावेळी सांगितलं.
 
उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांच्यात बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रवरुन वाद निर्माण झाला आहे. या वादाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने साक्षीदार म्हणून डॉ. पारकर यांचा जबाब नोंदवला.

बाळासाहेबांची दररोज तपासणी करणारे डॉ. जलील पारकर यांनी साक्षीदार म्हणून मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली होती. बाळासाहेबांचं १७ नोव्हेंबर, २०१२ मध्ये निधन झालं होतं. या प्रकरणात न्यायाधीश गौतम पटेल यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

१३ डिसेंबर, २०११ रोजी बनवलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या अंतिम मृत्यूपत्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा वाटा देण्यात आला आहे. तर वेगळं आपल्याला संपत्तीमधील फार कमी वाटा दिला असल्याचा दावा जयदेव यांचा आहे.

तसेच हे मृत्यूपत्र ग्राह्य धरावं, यासाठी उद्धव ठाकरे यांनी आधीच याचिका दाखल केली आहेत. तर जयदेव ठाकरेंनी मृत्यूपत्राच्या वैधतेवरच आक्षेप नोंदवला आहे. बाळासाहेबांची प्रकृती स्थिर नसताना या मृत्यूपत्रावर बाळासाहेबांची जबरदस्तीने स्वाक्षरी घेतल्याचा दावा जयदेव यांनी केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.