www.24taas.com, मुंबई
सूर्यास्तानंतर एका महिलेला अटक केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र पोलीस आयुक्त आणि नगर पोलीस आयुक्तांना चांगलंच फैलावर घेतलंय. तसंच सूर्यास्तानंतर आणि सूर्योद्यापूर्वी कोणत्याही महिलेला अटक करता येणार नाही, असे आदेशच उच्च न्यायालयानं पोलिसांना दिलेत.
न्यायमूर्ती ए.एस. ओका आणि न्यायमूर्ती शिंदे यांच्या खंडपीठानं महाराष्ट्राच्या पोलीस आयुक्त आणि नगर पोलीस आयुक्तांना दोन आठवड्यांच्या आत तमाम पोलीस वर्गाला यासंबंधी जागृत करण्याचे आदेश दिलेत. कलम ६४(४)मध्ये अपरिहार्य परिस्थितीसोडून अन्य कोणत्याही गुन्ह्यामध्य कोणत्याही महिलेला सूर्यास्तानंतर आणि सूर्योद्यापूर्वी अटक करण्यापासून मज्जाव करण्यात आलाय. पोलिसांना सूर्यास्तानंतर आणि सूर्योद्यापूर्वी एखाद्या महिलेला अटक करायची असेल तर त्यासाठी त्यांना न्यायिक मॅजिस्ट्रेटकडून पूर्वसंमती घेणं आवश्यक असेल.
न्यायालयानं हे आदेश भारती खंदहार यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निर्णय देताना दिलेत. भारतीला अलाहाबाद न्यायालयाकडून जारी करण्यात आलेल्या अजामीनपात्र वारंटवरून माटुंगा पोलीसांनी अटक केली होती. १३ जून २००७ रोजी पोलीस उपनिरीक्षक मारुती जाधव यांनी भारतीला अटक केली होती.