www.24taas.com, मुंबई
डॉक्टर लिपी म्हटलं की आपल्याला आठवतं ते डॉक्टरांनी त्यांच्या विशिष्ट शैलीमध्ये लिहून दिलेलं आणि कितीही समजून घेतलं तरी न समजणारं प्रिस्क्रिप्शन... पण आता या शैलीला सुधारण्याच्या सूचना राज्य सरकारनं डॉक्टरांना केल्या आहेत आणि डॉक्टरांनीही रुग्णांच्या हितासाठी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
डॉक्टरांनी लिहून दिलेलं प्रिस्क्रिप्शन आपल्याला तर सोडाच औषध विक्रेत्यानांही कधीकधी समजत नाही. त्यामुळं चुकीची औषधंही रुग्णांना दिली जातात. याचा विचार करुन राज्य शासनानं प्रिस्क्रिप्शन कॅपिटलमध्ये लिहा किंवा सुवाच्य अक्षरात लिहा अशा सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत. डॉक्टरांनीदेखील य़ा सुचनेचं स्वागत केलं आहे.
महाराष्ट्र ‘कौऊंसिल ऑफ इंडियन मेडिसीन’ यांनीही या राज्य सरकराच्या सुचनेचं स्वागत करत आपल्या वेबसाईटवरही प्रिस्क्रिप्शन संदर्भात सूचना टाकणार असल्याचं सांगितलं. राज्य शासनाने केलेल्या सुचनांचं वैद्यकीय विश्वासह इतर संघटनांनीही स्वागत केलंय. त्यामूळं इथून पुढं डॉक्टर लिपीच्या अडथळ्यामुळे चुकीची औषधं तर मिळणार नाहीतच शिवाय आपल्यालाही आरामात औषधांची नावे वाचता येणारेत.