राज ठाकरेंचं संरक्षण करणारी जीप दरेकरांच्या दारात!

राज ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांच्यातली दरी वाढलीय. राज यांनी दरेकरांबरोबरचे राजकीय संबंध संपुष्टात आल्याचे संकेत दिलेत आणि याच गोष्टीचा उलगडा झालाय एका जीपच्या गोष्टीतून... 

Updated: Dec 24, 2014, 02:27 PM IST
राज ठाकरेंचं संरक्षण करणारी जीप दरेकरांच्या दारात! title=

मुंबई : राज ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांच्यातली दरी वाढलीय. राज यांनी दरेकरांबरोबरचे राजकीय संबंध संपुष्टात आल्याचे संकेत दिलेत आणि याच गोष्टीचा उलगडा झालाय एका जीपच्या गोष्टीतून... 

एक जीप... इनव्हेडर... एम एच ०६, ए एस ३७४४... ही गाडी अगदी काल-परवापर्यंत राज ठाकरेंच्या ताफ्याची शान होती. राज ठाकरे कुठेही गेले तरी ही जीप त्यांची साथ सोडायची नाही. पण, आता तीच जीप बोरिवलीतल्या तिच्या मूळ घरी परतलीय...  इतके दिवस कृष्णकुंजखाली असणारी हीच इनव्हेडर आता प्रवीण दरेकरांच्या कार्यालयाबाहेर पार्क करण्यात आलीय. 

ही जीप राज ठाकरेंच्या ताफ्यात आली ती २००८ मध्ये... मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी रान पेटवल्यावर त्यांची सुरक्षा कमी करुन 'झेड'हून 'वाय'वर आणण्यात आली. मग राज ठाकरेंनी स्वतःहूनच सुरक्षा नाकारली. त्यावेळी प्रवीण दरेकरांनी काही माजी सैनिकांचं कडं राज ठाकरेंसाठी सज्ज केलं आणि त्याबरोबर ही इनव्हेडर जीपही. याच जीपमध्ये बसून माजी सैनिक राज ठाकरेंचं रक्षण करायचे. 

पण कालांतरानं राज ठाकरेंची सुरक्षा वाढली. त्यानंतर हे माजी सैनिकही निघून गेले. पण, जीप मात्र राज ठाकरेंच्या ताफ्यात कायम होती. विविध दौऱ्यात, लोकसभा, विधानसभा प्रचारात राज ठाकरेंची सोबत केलेल्या या जीपच्या स्टोरीत विधानसभा निवडणुकीनंतर ट्विस्ट आला. पक्षाची ध्येयधोरणं चुकली अशी रोखठोक टीका प्रवीण दरेकरांनी विधानसभा निकालानंतर जाहीरपणे केली... आणि तिथेच पहिली ठिणगी पडली. पाठोपाठ प्रवीण दरेकरांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. पक्ष नेतृत्वानंही कठोर भूमिका घेत सगळ्यांचे राजीनामे स्वीकारले. प्रवीण दरेकरांचे भाऊ प्रकाश दरेकरांना नगरसेवकांच्या भर बैठकीतून दार दाखवण्यात आलं. 

पक्षात राहून पक्ष फोडण्याच्या कारवाया सुरु आहेत का? असा संशय नेतृत्वाच्या मनात होता. त्यामुळे राजीनामे दिलेल्यांशी कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेवू नका, असं फर्मान कृष्णकुंजवरुन सुटलं. राज ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांच्यातली दरी वाढवणाऱ्याच या सगळ्या घटना होत्या आणि त्याचं पुढचं पाऊल म्हणजेच राज ठाकरेंनी काल-परवापर्यंत वापरलेली ही जीप प्रवीण दरेकरांकडे परत पाठवून दिली. आता ती दरेकरांच्या कार्यालयाबाहेर उभी आहे.

'तरीही मी पक्षातच आहे, मी अजून पक्ष सोडलेला नाही, मी पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे, माझ्याशी संपर्क न करण्याबद्दल मला तरी अजून कुणी कल्पना दिली नाही', ही प्रवीण दरेकरांची भूमिका आजही कायम आहे. त्यांच्या कार्यालयाबाहेरच्या फलकावर, बाहेर उभ्या असलेल्या अँब्युलन्सवरही राज ठाकरेंचा फोटोही अजून कायम आहे. मधल्या काळात प्रवीण दरेकर भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांकडून त्यांना ऑफर असल्याची चर्चा आहे. पक्ष नेतृत्वानं परतीचे कापलेले दोर अशी सध्याची परिस्थिती आहे, त्यामुळे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी नव्या वर्षात प्रवीण दरेकर नवा राजकीय घरोबा करतील, अशी तरी चिन्हं आहेत. पण या सगळ्यामुळे कार्यकर्ता प्रचंड संभ्रमात आहे... आणि ही जीप कृष्णकुंजहून बोरिवलीत परत आल्यापासून कार्यकर्त्यांची घालमेल जास्तच वाढलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.