मुंबई : महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत 15 जानेवारीनंतरच बोलणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संक्रांत असल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये सध्या चर्चा होणार नसल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान युतीच्या चर्चेसंदर्भात अधिकृतरित्या विचारणा झाली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अनिल देसाईंनी दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी चर्चेसाठी प्रस्ताव दिला आहे, त्यानुसार आम्ही कामाला लागलो असल्याचंही देसाई म्हणाले आहेत.
युती झाली तर सगळीकडे व्यवस्थित व्हावी ही आमची इच्छा आहे. स्वबळाची प्रत्येक पक्षाची तयारी असते, असं सूचक वक्तव्य अनिल देसाईंनी केलं आहे. गेली 20 वर्ष आम्ही सोबत लढलो आहेत. मुंबईकरांनी विश्वासानं निवडून दिलं आहे, त्यामुळे पारदर्शकतेचा वेगळा अर्थ काय हे माहित नाही, असं प्रत्युत्तर देसाईंनी दिलं आहे. युतीचा निर्णय हा पारदर्शी कारभाराच्या आधारावरच घेतला जाईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.