www.24taas.com, मुंबई
पनवेल-कळंबोली येथील आश्रमशाळेतील गतीमंद मुलीवर बलात्कार प्रकरणी आज विशेष न्यायालयानं शिक्षा सुनावण्यात आलीय. या प्रकरणातील प्रमुख आरोपी रामचंद्र करंजुले याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलीय. तर दोन महिलांना दहा वर्षांची शिक्षा विशेष न्यायालयानं सुनावलीय.
कल्याणी सुधारगृह लैंगिक शोषण प्रकरणात मुख्य आरोपी करंजुले याला खूनाच्या गुन्ह्यात दोषी धरलं गेलंय. करंजुले हा सुधारगृहाचा संस्थापक होता. करंजुलेसह इतर सहा जणांविरुद्ध कोर्टात गुन्हा सिद्ध झाला होता. पाच मुलींवर लैंगिक छळ आणि बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. या खटल्यातील चार आरोपींची न्यायालयानं पुराव्याअभावी सुटका केली गेलीय. बलात्कार आणि खून प्रकरणी करंजुले याला विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलीय... तर या प्रकरणातील दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. या प्रकरणात दोन महिलांचाही समावेश आहे त्यांना प्रत्येकी दहा वर्षांची शिक्षा दिली गेलीय.
आश्रमशाळेतील तीन अल्पवयीनं मुलींसह एकूण पाच गतीमंद मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. यातील एक मुलगी सामूहिक बलात्कारानंतर मृत्यूमुखी पडली. कळंबोली येथील `कल्याण महिला बाल सेवा` या खासगी आश्रमशाळेतील हा प्रकार संस्थापकांच्या वरदहस्तानेच घडल्याचं तपासात स्पष्ट झालं होतं. त्यानंतर झालेल्या चौकशीत आश्रमशाळेती एकूण १९ मुलींवर तीन आरोपींनी बलात्कार केल्याचं स्पष्ट झालं होतं.