दहीहंडी : मुंबईत पोलिसांकडून अनेकांना नोटीसा, ठाण्याकडे लक्ष

सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीवर लादलेले निर्बंध झुगारून कोणी न्यायालयाचा अवमान केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Updated: Aug 24, 2016, 11:34 PM IST
दहीहंडी : मुंबईत पोलिसांकडून अनेकांना नोटीसा, ठाण्याकडे लक्ष title=

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीवर लादलेले निर्बंध झुगारून कोणी न्यायालयाचा अवमान केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

तसेच दहीहंडी आयोजकांना तशा नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. मात्र यानंतरही ठाण्यात मनसेने आपली ९ थरांची हंडी कायम ठेवली असून तर इतर सर्व बड्या आयोजकांनी मात्र न्यायालयाचा आदर राखत उत्सव साजरा करणार असल्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच उद्या दहीहंडीचा सण साजरा करावा लागेल, अशी सक्त ताकीद मुंबई पोलिसांनी दिलीय. न्यायालयाच्या आदेशाचं काटेकोर पालन करण्यासाठी सर्व दहिहंड्यांची व्हिडिओ शुटिंग करण्यात येणार आहे. त्यानंतर हे व्हिडिओ शुटिंग तपासून संबंधित आयोजक आणि गोविंदा पथकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलीय. 

यंदा न्यायालयाच्या आदेशांमुळे ठाण्यातील सर्व आयोजकांनी नमते घेतल्याचे पाहायला मिळत आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठान तर्फे वर्तकनगर भागात उभारण्यात येणारी दहीहंडी ही न्यायालयाच्या आदर राखत कायद्याच्या चौकटीत राहून मोठ्या उत्साहात साजरी करणार असल्याची भूमिका आयोजकांनी व्यक्त केली आहे.संघर्ष समितीच्यावतीने दहहंडी उत्सव साजरा करण्यात येणार नसून केवळ पारंपरिक पद्धतीने कृष्ण जन्माष्टमी साजरी करणार असल्याची भूमिका आयोजक जितेंद्र आव्हाड यांनी घेतली आहे. तर, दुसरीकडे मनसेने दहीहंडी त्याच जल्लोषात साजरी करण्याची घोषणा केली असून ठाण्याच्या भगवती मैदानात होणार-या या हंडीत ९ थर लावणाऱ्या पथकाला ११ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

या दहीहंडीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित राहण्याची दाट शक्यता असून त्यामुळे ही दहीहंडी चांगलीच गाजणार आहे. या उत्सावाच्या पूर्वसंध्येला मनसेनं न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी पोस्टर्स लावली होती. ती पोलिसांनी काढल्यानंतर काही काळ परिसरात तणावाच वातावरण होते. मनसेच्या नेत्यांनी मात्र त्यांच्या या कृतीच समर्थन केल आहे. 

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी देखील शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. नेहमीच्या आयोजकांनी न्यायलयाचा आदर करण्याची घेतलेली भूमिका आणि मनसेनं  प्रतिष्ठेच्या केलेल्या या मुद्द्यामुळे ठण्यातील दहीहंडी उत्सव चर्चेत आहे.