www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडून आपल्याला मानसिक त्रास होत आहे, म्हणून आपण शिवसेना नगरसेवकपदाचा राजीनामा देणार आहोत, असं नगरसेवक शीतल म्हात्रे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, रात्री उशिरा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा पाठिमागे घेतला.
स्थानिक नेतृत्वाकडून होणार्या छळाबाबत पक्षप्रमुखांकडेही सुनावणी होत नसल्याने ताण वाढूननगरसेविका शीतल म्हात्रे या बुधवारी चक्कर येऊन कोसळल्या. रक्तदाब वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र एवढे नाट्य घडल्यानंतरही पक्षप्रमुख दखल घेत नसल्याने म्हात्रेंनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त होते.
दहिसर येथील नगरसेविका शीतल म्हात्रे, भाजपाच्या मनीषा चौधरी आणि डॉ. शुभा राऊळ यांनी स्थानिक नेतृत्वाविरोधात उठाव केला आहे. याप्रकरणी पालिकेत आवाज उठविण्यात आला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने या नगरसेविकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मीडियाकडे धाव घेतली. डॉ. राऊळ यांच्या सोशल मीडियावरील खरमरीत पोस्टनंतरही `मातोश्री`ने आपले डोळे बंद ठेवले होते. मीडियाने हे प्रकरण लावून धरल्यानंतर रात्री उशिरा सेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी म्हात्रे यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा तुर्तास मागे घेतला.
आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडून आपल्याला मानसिक त्रास होत आहे, अतिशय वाईट वागणूक मला दिली जात आहे, असं शीतल म्हात्रे यांनी झी मीडियाशी बोलतांना सांगितलं. सुसंस्कृत आणि सुशिक्षित महिलांना राजकारणात येतांना विचार करावा, इथे राक्षस आहेत!, असा सल्लाही शीतल म्हात्रे यांनी दिला होता. आपल्या आजारपणाला शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकरच जबाबदार आहेत. शिवसेनेत दुफळी माजू नये म्हणून आपण वेळोवेळी हे सहन केलं, मात्र आता ते असह्य झालं आहे. मुंबईसाठी आपण काहीतरी करू हे स्वप्न ठेऊन आपण नगरसेवक झालो होतो. मात्र आता ते शक्य होत नसल्याचं दिसतंय, म्हणून मी आपल्या पदाची राजीनामा देते आहे, असं म्हात्रे यांनी काल म्हटलं होतं.
आपल्याला उद्धव ठाकरे यांच्यासमोर सर्व गाऱ्हाणी मांडायची होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी आपल्याला भेटच दिली नसल्याचंही शीतल म्हात्रे यांनी झी मीडियाशी बोलतांना सांगितलं. उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनी यांच्यावर आपलं शिवसेनेएवढंच प्रेम आहे. मी कधीही शिवसेना सोडणार नाही, मी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला तरी शिवसेनेसोबत राहिनं असंही शीतल म्हात्रे यांनी स्पष्ट केलं होतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.