मुंबई : मूल दत्तक प्रक्रिया नियमांमध्ये सरकारकडून बदल करण्यात आलाय. मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत इच्छुक पालकांना आतापर्यंत असलेला मूल निवडण्याचा अधिकार काढून घेण्यात आलाय.
नवीन नियमानुसार यापुढे पालकांना दत्तक घ्यायच्या मुलाची निवड करता येणार नाहीये. पण राष्ट्रीय दत्तक मंडळाकडून देऊ करण्यात आलेले मूल स्वीकारण्याचा आणि नाकारण्याचा अधिकार पालकांना असेल.
केअरिंग्स या सरकारच्या दत्तक पोर्टलमध्ये नोंदवण्यात आलेल्या पालकांना तीन मुलांपैकी एक मूल निवडण्याचा अधिकार देण्यात आला होता. मात्र दत्तक घेण्याची प्रक्रिया धीम्या गतीने होते. त्यामुळं मूलं दीर्घकाळ या प्रक्रियेत अडकून बसतात.
नव्या नियमानुसार दत्तक प्रक्रियेत सर्वच मुलं सारख्याच प्रमाणात इच्छुक पालकांपर्यंत नेण्यात येतील. प्रतीक्षा यादीत खालच्या स्थानावर जाण्यापूर्वी मुलं तीन फे-यांमध्ये इच्छुक पालकांपर्यंत नेण्यात येतील. प्रत्येक फेरीत वेगळ्या मुलाची अथवा मुलीची माहिती पालकांना देण्यात येईल. मूल निवडण्याचा अधिकार देऊन वस्तूकरण रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.