www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
मुंबईतील अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला केंद्रीय पर्यावरण खात्याने तत्वतः परवानगी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांनी दिली.
केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाकडे परवानगीसाठी प्रलंबित राज्यातील प्रकल्पांच्या प्रकरणांबाबत जयंती नटराजन यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली. दक्षिण मुंबईतील राजभवनसमोरील समुद्रात १६ हेक्टरचा एक मोठा खडक राज्य सरकारने शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निश्चित केला आहे. त्याबाबतची सविस्तर माहिती घेतल्यानंतर या स्मारकाला नटराजन यांनी तत्वतः परवानगी दिली.
शिवाजी महाराजांचे स्मारक हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय असल्यामुळे खास बाब म्हणून या स्मारकाला परवानगी दिली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय पर्यावरणमंत्री नटराजन यांनीही त्यास दुजोरा दिला. त्यामुळे आता अरबी समुद्रातील शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा प्रश्न निकाली निघालाय. असे असले तरी जवळपास आणखी ४० परवानग्या घ्याव्या लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
*झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.