www.24taas.com, मुंबई
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ पुन्हा एकदा त्यांच्या एमईटी शैक्षणिक संस्थेमुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. एमईटीच्या शेजारीच असलेल्या जनरल ए.के वैद्य मैदानाचा वापर हा नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोप वांद्रयातील रहिवाशांनी केलाय. रहिवाशांनी महापालिकेकडे तक्रारही नोंदवलीय. महापालिकेनं एमईटीविरुद्ध कारवाई करावी अशी या रहिवाशांची मागणी आहे.
वांद्रे भागात असलेल्या एमईटीच्या शेजारी लागून जनरल अरुणकुमार वैद्य क्रिडांगण आहे. एमईटीच्याच उत्सव या कार्यक्रमामुळे हे क्रिडांगण चर्चेत आलंय. हे क्रिडांगण फक्त खेळांशी संबधित बाबींसाठी वापरण्यात येईल असा करार महानगरपालिका आणि एमईटीच्या दरम्यान झालाय. मात्र त्या कराराचं उल्लंघन करत ‘उत्सव’ या कार्यक्रमासाठी या क्रिडांगणात भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं आहे. यामुळे या क्रिडांगणाचं नुकसान होत असल्याचा आरोप करत हे प्रकार लवकरात लवकर बंद करावेत अशी मागणी इथल्या रहिवाशांनी केली आहे. या कार्यक्रमात खेळांव्यतिरिक्त होणा-या फॅशन शो, फन शो सारख्या इतर गोष्टींमुळे रहिवाश्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय.
या क्रिडांगणाच्या व्यवस्थापनाकडे एमईटीच लक्ष देते. या मैदानाच्या देखभालीसाठी मुंबई महानगरपालिका आणि एमईटीमध्ये करार झाला होता या करारातील कलम 19 नुसार हे क्रिडांगण फक्त खेळ आणि त्यासंबंधीत बाबींसाठीच वापरण्यात यावं. कलम 20 नुसार या क्रिडांगणावर कुठलेही सामाजिक, व्यावसायिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम किंवा बैठका, लग्न समारंभ, स्नेहसंमेलन, जत्रा असे कुठलेही कार्यक्रम करण्याची परवानगी नाही. असं स्पष्ट करण्यात आलंय.त्यामुळे एमईटीच्या उत्सव या कार्यक्रमामुळे भुजबळ कायदेशीररित्या अडचणीत येऊ शकतात. या संदर्भातील तक्रार महानगरपालिकेकडे करण्यात आलीय. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार पालिकेने एमईटीला नोटीसही बजावली आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा कायद्याला बगल दिल्याच्या तक्रारीवरुन एमईटी आणि पर्यायाने भुजबळ कारवाईच्या कचाट्यात सापडणार का? असा सवाल उभा राहतोय.