www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
५ जानेवारीला कुर्ला टर्मिनसला उतरलेली अनुह्या इस्टर या तरुणीचा मृतदेह १४ जानेवारीला कांजुरमार्ग इथल्या झुडपात आढळला होता. या हत्येमागे कुर्ला रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा किंवा टॅक्सीचालकांचाच हात असावा या पोलिसांच्या अंदाजाला कलाटणी देणारी बाब पुढे आलीय.
कुर्ला रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूमसमोर असलेल्या कॅमेऱ्यानं इस्टर अनुह्याला टिपलं असून तिच्यासोबत एक परिचित व्यक्ती दिसल्याने हा इसम कोण याचा शोध आता सुरू झाला आहे. तो हाती लागल्यानंतर या हत्या प्रकरणाचं गूढ उकलेल, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
अनुह्या प्लॅटफॉर्मवर उतरताना किंवा स्टेशनबाहेर पडताना कोणत्याही सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं टिपले नव्हतं आणि तिच्या फोनवरून कुणाला कॉलही केला गेला नव्हता. त्यामुळं अनुह्याने स्टेशनबाहेरून अंधेरीतल्या आपल्या होस्टेलकडे जाण्यासाठी जी रिक्षा किंवा टॅक्सी केली असेल, त्यांनीच अत्याचार करून अनुह्याला ठार मारलं असावं, असा अंदाज व्यक्त करत मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली होती.
मात्र जेव्हा रेल्वे स्टेशनातील सर्व कॅमेऱ्यांचं फुटेज बारकाईनं तपासलं तेव्हा वेटिंग रूमसमोरील एका कॅमेऱ्यात अनुह्या दिसली आहे. तिच्या हातातली बॅग घेऊन एक पस्तीशीतला तरुण पुढं चालतोय आणि मागं अनुह्या मोबाईलवर बोलत असल्याचं त्यात दिसतंय. हा व्यक्ती अनुह्याची परिचित असावी, असं त्यांच्या हालचालींवरून दिसतं. त्या पुरुषाकडे स्वतःचं कोणतंही सामान नव्हतं. त्यामुळं तो बहुदा मुंबईतूनच अनुह्याला न्यायला आला असावा, असंही सांगितलं जातंय. तसंच, या पुरुषाचा चेहरा दक्षिण भारतातील लोकांशी साम्य असल्यासारखा वाटतो, असाही पोलिसांचा अंदाज आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.