'कॅम्पा कोला'चं इमोशनल रोलर-कोस्टर...

कोर्टाच्या निर्णयामुळे कॅम्पा कोलावासियांची निराशा झालीय. सरकार यावर काही तोडगा काढेल आणि आपल्याला राहतं घरं सोडून देशोधडीला लागावं लागणार नाही, या आशेवर कोर्टाच्या आदेशांमुळे पाणी फिरलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 19, 2013, 08:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोर्टाच्या निर्णयामुळे कॅम्पा कोलावासियांची निराशा झालीय. सरकार यावर काही तोडगा काढेल आणि आपल्याला राहतं घरं सोडून देशोधडीला लागावं लागणार नाही, या आशेवर कोर्टाच्या आदेशांमुळे पाणी फिरलंय. यामुळे गेल्या आठवड्यात जल्लोष करणारे ‘कॅम्पाकोला’ रहिवाशी पुन्हा एकदा दुःखात बुडालंय. निर्णय ऐकल्यानंतर रहिवाशांचे डोळे पुन्हा एकदा पाण्यानं डबडबलेत.
हा महिना ‘कॅम्पा कोला’वासियांसाठी इमोशनल रोलर-कोस्टर ठरलाय. सुप्रीम कोर्टानं कारवाईसाठी दिलेली ११ तारखेची मुदत संपल्यानंतर १२ तारखेला सकाळी ३०० पोलिसांच्या फौजफाट्यासह महापालिका अधिकारी कॅम्पा कोलावर दाखल झाले. यावेळी आक्रमक झालेल्या रहिवाशांची अधिकारी - पोलिसांशी झटापटही झाली होती. त्या दिवशी केवळ मार्किंग करून त्याचा अहवाल सुप्रीम कोर्टाला सादर करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा महापालिकेचे अधिकारी कम्पाऊंडवर दाखल झाले खरे, मात्र पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं घरं रिकामी करण्यासाठी ३१ मे २०१४ पर्यंत मुदतवाढ देत दिलासा दिला.
मात्र, हा दिलासा अल्पजीवीचं ठरलाय. कारण आजच्या सुनावणीत काहीतरी समाधानकारक हाती लागेल ही ‘कॅम्पा कोला’वासियांची आशा फोल ठरलीय. त्यामुळे ते पुन्हा एकदा निराशेच्या गर्तेत लोटले गेले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.