www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सुप्रीम कोर्टानं दया याचिका फेटाळून लावल्यानंतर कॅम्पाकोलाच्या रहिवाशांनी आपली घरं रिकामी करायला सुरूवात केलीय.
अनधिकृत फ्लॅट पाडण्यासाठी हंगामी स्थगिती देण्यासही न्यायमूर्ती जे. एस. केहेर आणि न्या. सी नागप्पन यांच्या खंडपीठानं नकार दिला. 2 जूनपर्यंत मुदत देवूनही कोणी चाव्या ताब्यात दिल्या नसल्यानं महापालिकेनं अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला होता.
जे रहिवासी घर खाली करणार नाहीत त्यांची वीज, पाणी आणि गॅस तोडण्याची तयारी पालिकेनं केलीय. त्यामुळे काल सकाळपासूनच हताश झालेल्या कॅम्पाकोलावासियांनी आपली घरं रिकामी करण्यास सुरूवात केलीय. घरं वाचवण्याचा त्यांचा अखेरचा प्रयत्नही फसलाय. आता अनधिकृत फ्लॅटमध्ये राहणाऱ्या १०२ कुटुंबांना कष्टानं उभं केलेलं घर सोडून देशोधडीला लागावं लागणार आहे.
साहित्य हलवलं जात असलं तरी कॅम्पाकोला कंपाऊंड सोडणार नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. यासाठी तंबू ठोकण्याचं काम सुरू केलं असून तंबूतच तळ ठोकणार असल्याचं रहिवाशांनी सांगितलंय. कॅम्पाकोलावासियांना न्याय देण्याचं सर्वपक्षिय नेत्यांचं आश्वासन ही केवळ घोषणाबाजीच ठरलीय.
व्हिडिओ पाहा -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.