‘कॅम्पा कोला’ची मुदत संपली; 488ची नोटीस बजावणार

कॅम्पा कोला वासियांनी चाव्या ताब्यात देण्यासाठी दिलेली 72 तासांची मुदत संध्याकाळी पाच वाजता संपली. कुणीही फ्लॅटच्या चाव्या महापालिकेकडं न सोपवता उलट पालिका आणि सरकारसमोर 14 अटी ठेवल्या.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 12, 2014, 07:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कॅम्पा कोला वासियांनी चाव्या ताब्यात देण्यासाठी दिलेली 72 तासांची मुदत संध्याकाळी पाच वाजता संपली. कुणीही फ्लॅटच्या चाव्या महापालिकेकडं न सोपवता उलट पालिका आणि सरकारसमोर 14 अटी ठेवल्या.
आता मुदत संपल्यानंतर महापालिका प्रशासन 488 ची नोटीस बजावण्याची शक्यता आहे. शनिवार ते सोमवार यांदरम्यान ही नोटीस बजावली जाईल. ‘जागेवर येऊन अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणार’ अशी अगोदर सूचना देणारी नोटीस म्हणजे 488 ची नोटीस.... 17 जूनपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होईल. यावेळी, सर्वप्रथम रहिवाशांना इमारत परिसरात उभारलेल्या अनधिकृत तंबूवर कारवाई करण्यात येईल. पाऊस सुरु झाला तरी कारवाई थांबणार नाही, असं अतिरिक्त आयुक्त मोहन आडवानी यांनी माहिती दिलीय.
निराशा, हुंदके, डोळ्यात आसू आणि सरकारविरोधात संताप... कॅम्पा कोलावासियांची ही दिवसभर स्थिती होती. मुंबई महापालिकेनं चाब्या ताब्यात देण्याविषयीची 72 तासांची मुदत संध्याकाळी पाच वाजता संपली. परंतु कुणीही फ्लॅटची चावी महापालिकेकडं जमा केली नाही. चाव्या जमा कऱण्याचा शेवटचा दिवस असल्यानं सकाळपासूनच रहिवाशांमध्ये अस्वस्थता जाणवत होती. परंतु, शेवटपर्यंत लढत राहण्याचा निर्धार मात्र रहिवाशी व्यक्त करत होते. तसंच इथल्या रहिवाशांनी महापालिका आणि राज्य सरकारला पत्र लिहून 14 अटींची पूर्तता केल्यास चाव्या ताब्यात देण्यास तयार असल्याचं कळवलं.
‘कॅम्पा कोला’वासियांनी सरकारसमोर ठेवलेल्या अटी...
* मुंबईसह राज्यातील सर्व अनधिकृत बांधकाम तोडण्यात यावे.
* आगामी काळात राज्य सरकारनं अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासंबंधी कुठलाही कायदा अथवा ऑर्डिनन्स काढता कामा नये.
* ज्या बिल्डरनं आम्हाला फसवलं आहे, त्यांची मालमत्ता विकून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी.
* कॅम्पा कोला जमिनीचा पुनर्विकास करायचा झाल्यास आमची सहमती आवश्यक असेल.
* आमच्या बाजूने निकाल आल्यास बाजारभावानुसार नुकसान भरपाई द्यावी
* अनधिकृत बांधकाम तोडताना पाच मजल्यांखाली राहणाऱ्यांना त्रास नको
* सरकारने घेतलेली स्टॅम्प ड्युटी व्याजासह परत करावी
अशा अशक्यप्राय 14 अटी रहिवाशांनी पालिका आणि सरकारसमोर ठेवल्या आहेत.
सर्वपक्षीय नेते नेहमीच ‘कॅम्पा कोला’ रहिवाशांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनीही मानवतेच्या दृष्टीकोनातून पावसाळ्यापर्यंत कॅम्पा कोला इमारतींवर हातोडा चालवू नये, असं म्हटलंय.

कॅम्पाकोलातली घरं रिकामी करण्यासाठी आता महापालिका आणि कॅम्पाकोला रहिवासी हा संघर्ष अखेरच्या टप्प्यात पोहोचलाय. आता १७ जूननंतर नक्की काय कारवाई होते, ते पहावं लागेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.