वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना- राणे युद्ध रंगणार?

मेरे अंगनेमं तुम्हारा क्या काम है, असं म्हणण्याची वेळ सध्या शिवसेनेवर आलीय. कारण वांद्रे विधानसभा निवडणुकीचा आखाडा प्रचंड रंगतदार झालाय. शिवसेना आमदार प्रकाश सावंत अर्थात बाळा सावंत यांचं निधन झाल्यानं ही पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीसाठी काँग्रेसनं नारायण राणेंना उमेदवार म्हणून विचारणा केली आणि मोठ्ठा ट्विस्ट आला. एकेकाळी सिंधुदुर्गाचा राजा असलेल्या राणेंना विधानसभा निवडणुकीत कोकणातल्या लोकांनी असं काही अस्मान दाखवलं की राणेंवर मुंबईमार्गे विधिमंडळात शिरण्याची वेळ आलीय. मुळातच विधानसभेच्या बाहेर असलेले राणे प्रचंड अस्वस्थ आहेत. प्रदेशाध्यक्षपदीही त्यांची डाळ शिजली नाही. सेना-भाजपमध्ये रंगलेला कलगीतुरा आणि कमकुवत विरोधक अशा परिस्थितीत राणेंना आखाड्यात उतरायला योग्य बॅटल स्पिच तयार झालंय. 

Updated: Mar 12, 2015, 07:56 PM IST
वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना- राणे युद्ध रंगणार? title=

मुंबई: मेरे अंगनेमं तुम्हारा क्या काम है, असं म्हणण्याची वेळ सध्या शिवसेनेवर आलीय. कारण वांद्रे विधानसभा निवडणुकीचा आखाडा प्रचंड रंगतदार झालाय. शिवसेना आमदार प्रकाश सावंत अर्थात बाळा सावंत यांचं निधन झाल्यानं ही पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीसाठी काँग्रेसनं नारायण राणेंना उमेदवार म्हणून विचारणा केली आणि मोठ्ठा ट्विस्ट आला. एकेकाळी सिंधुदुर्गाचा राजा असलेल्या राणेंना विधानसभा निवडणुकीत कोकणातल्या लोकांनी असं काही अस्मान दाखवलं की राणेंवर मुंबईमार्गे विधिमंडळात शिरण्याची वेळ आलीय. मुळातच विधानसभेच्या बाहेर असलेले राणे प्रचंड अस्वस्थ आहेत. प्रदेशाध्यक्षपदीही त्यांची डाळ शिजली नाही. सेना-भाजपमध्ये रंगलेला कलगीतुरा आणि कमकुवत विरोधक अशा परिस्थितीत राणेंना आखाड्यात उतरायला योग्य बॅटल स्पिच तयार झालंय. 

शिवसेना कुणाला उमेदवारी देणार?

या सगळ्यात निर्णायक भूमिका ठरणार आहे ती शिवसेनेची. शिवसेना कुणाला उमेदवारी देणार, त्यावर इतर पक्षांची बरीचशी गणितं अवलंबून आहेत. बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांची ही पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्याचवेळी उपविभागप्रमुख पुंडलिक सावंत, माजी नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वरही फिल्डिंग लावतायत. पण सावंत कुटुंबीयांशिवाय दुसऱ्या कुणाला संधी दिली तर सेनेसाठी ती अडचणीची खेळी ठरु शकते. बाळा सावंतांची लोकप्रियता आणि तृप्ती सावंतांना मिळणारी सहानुभूती यावर सध्या तरी तृप्ती सावंत यांचं पारडं जड दिसतंय. 

मनसेचं आव्हान नाही-

दुसरीकडे एखाद्या मतदारसंघात लोकप्रतिनिधीचा आजारपणामुळे किंवा अपघाती मृत्यू झाला असेल, तर मनसे निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा राज ठाकरेंनी केल्यानं मनसेच्या विरोधाचा मुद्दा निकाली निघालाय. 

भाजप काय करणार?

मनसेकडून धोका नसला, तरी भाजप काय करणार, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. समजा राणेंनी निवडणूक लढवली तर शिवसेनेला डिवचण्यासाठी भाजप राणेंना छुपी मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण राणेंसारखा तगडा विरोधक विधानसभेत आणणं, हे भाजपलाही कितपत परवडेल, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या राजकीय करिअरच्या निर्णायक वळणावर असलेले राणे भाजपकडडून निवडणूक लढवतील, असाही एक तर्क केला जातोय. 

एमआयएम फॅक्टर महत्त्वाचा

वांद्रे विधानसभा मतदारसंघात मुस्लीम मतांवर बरीचशी गणितं अवलंबून आहेत. गेल्यावेळी जवळपास 24 हजार मतं घेत एमआयएमचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. त्यामुळे एमआयएमला नजरेआड करुन चालणार नाही. या मुस्लीम मतांवर काँग्रेसही डोळा ठेवून आहे. पण बाळा सावंतांचा मुस्लीम मतदारांशीही अत्यंत चांगला संपर्क होता, त्यामुळे ही मतं कुणाकडे झुकणार, याची उत्सुकता कायम राहणार आहे. 

राणे आणि शिवसेना संघर्ष होणार?

या पोटनिवडणुकीत राणे उतरलेच, तर शिवसेनाही या पोटनिवडणुकीत त्वेषानं उतरेल, आणि शिवसेना विरुद्ध राणे या संघर्षाला पुन्हा धार येईल. बाळा सावंत यांची ओळख कट्टर शिवसैनिक आणि बाळासाहेबांचा निष्ठावंत अशी होती. त्यामुळे निष्ठावंत विरुद्ध गद्दार असा प्रचार शिवसेनेकडून केला जाऊ शकतो. राणेंसाठी मुळातच अस्तित्वाची लढाई सुरू झालीय.

आता या पोटनिवडणुकीतही राणेंचा पराभव झाला तर त्यांचं राजकीय करिअर संपुष्टात येऊ शकतं, अशी भीती व्यक्त होतेय. त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसनं राणेंना दिलेला हा प्रस्ताव आणखी किचकट आणि न उलगडणाऱ्या कोड्यासारखा झालाय. प्रस्ताव स्वीकारला तरी आणि नाही स्वीकारला तरी अडचण, अशा विचित्र कोंडीत राणे अडकलेत. ही कोंडी राणे स्वतःच 23 तारखेला सोडवू शकतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.