मुंबई : मुंबईत ३० आणि ३१ तारखेला मोठ्याप्रमाणात वाहनांची विक्री झाली. परिवहन आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार ३० तारखेला १३ हजार ७५७ वाहनं विकली गेली. तर ३१ तारखेला दुपारपर्यंतच १६ हजार वाहनं विकली गेली होती.
काल रात्री १२ वाजेपर्यंत अनेक शोरुमने गाड्या विकल्या असल्यामुळे आज अंतिम आकडा कळू शकेल. साधारणतः दररोज ७-८ हजार वाहने विकली जातात. जी गेल्या दोन दिवसात दुपट्टीने,तिपट्टीने विकल्याची माहिती परिवहन खात्याने दिली आहे.
सुप्रीम कोर्टाने बीएस ३ मॉ़डेलच्या गाड्यांवर आजपासून बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर वाहन कंपन्यांनी या गाड्यांच्या खरेदीवर मोठी सूट जाहीर केली होती. ५ हजारापासून ते तब्बल २० हजार रुपयांपर्यंत दुचाकींच्या खरेदीवर सूट देण्यात आली होती.
याचा फायदा अनेकांनी घेत मोठी खरेदी केली. शेवटचे दोन दिवस वाहन खरेदीसाठी अनेक ठिकाणच्या शोरुम्सच्या बाहेर लोकांनी गर्दी केली होती.