शिवसेना-भाजप युतीचं ठरलं, दानवेंची मातोश्रींबाहेरून घोषणा

विधानसभा निवडणूक होते न होते तोच आता महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वीचं चित्र काहीसं वेगळं दिसतंय. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या शिवसेना - भाजपानं आता महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Mar 25, 2015, 06:48 PM IST
शिवसेना-भाजप युतीचं ठरलं, दानवेंची मातोश्रींबाहेरून घोषणा title=

मुंबई: विधानसभा निवडणूक होते न होते तोच आता महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वीचं चित्र काहीसं वेगळं दिसतंय. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या शिवसेना - भाजपानं आता महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची आज बैठक झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी युती अभेद्य असल्याची घोषणा केली आहे. 

नवी मुंबई आणि औरंगाबाद महपालिका निवडणुकीचा कार्यक्रम तयार झाला असून २२ एप्रिल रोजी या महापालिकांसाठी मतदान होणार आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादीचं तर औरंगाबादमध्ये शिवसेनेचं वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपानं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत स्वतःचं नशीब आजमावून बघितलं. मात्र मतदारांनी दोन्ही पक्षांना एकहाती सत्ता दिली नाही आणि शेवटी सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपाला एकत्र यावं लागलं. 

आता राज्यात भाजपा - शिवसेना युतीचं सरकार असलं तरी एकमेकांवर कुरघोडी एकही संधी दोन्ही पक्ष सोडत नाही. यापार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र राहणार की नाही याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. 

आज उद्धव ठाकरे आणि रावसाहेब दानवे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही नेत्यांचं युतीवर एकमत झालं. मात्र औरंगाबादमध्ये शिवसेना - भाजपामध्ये जागावाटपात ५० - ५० फॉर्म्यूलावर संघर्ष सुरु आहे. यामुळं पक्ष नेत्यांचं एकमत झालं तरी स्थानिक पातळीवरील नेते युतीसाठी तयार आहेत का? हा मोठा प्रश्न आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.