मुंबई : नव्या भाजप सरकारमधील मंत्र्यांमध्ये सध्या शासकीय बंगले आणि मंत्रालयातल्या दालनांच्या निवडीवरून स्पर्धा सुरू झालीय. रामटेक, देवगिरी, पर्णकुटी अशा काही अलिशान बंगल्यांसाठी अनेक मंत्र्यांनी फिल्डिंग लावलीय. शिवाय मंत्रालयातच्या सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासाठी रस्सीखेच सुरू आहे.
प्रथमच स्वबळावर सत्तेवर आलेल्या भाजपमध्ये सगळंच काही आलबेल नाही. इच्छेनुसार खाती मिळाली नाहीत म्हणून काही मंत्री नाराज असल्याचं समजतंय... तर आता याच मंत्र्यांमध्ये सध्या चांगले बंगले मिळवण्यासाठी स्पर्धा रंगलीय.. आपल्या इच्छेनुसार बंगल्याची मागणी करणारी पत्रं मंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिलीत.
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सिनियर मंत्र्यांमध्ये रामटेक बंगला मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. त्याला कारणही तसेच आहे. रामटेक हे सत्तेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या मंत्र्याचे निवासस्थान आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांचे वास्तव्य असते, तसे रामटेकवर दीर्घ काळ उपमुख्यमंत्र्यांचे वास्तव्य राहिलेले आहे. भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद असणार नाही, त्यामुळे किमान हा बंगला मिळाला तर सत्तेत आपले दुसरे स्थान समजले जाईल, असे ज्येष्ठ मंत्री मानत आहेत.
'रामटेक' बंगला मिळावा, यासाठी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचे क्षेत्रफळ १० हजार ९६० चौरस फुट इतके आहे, तर रामटेक हा ८ हजार ८५७ चौरस फूट क्षेत्रफळ असलेला दुसरा मोठा बंगला आहे. समुद्राला खेटूनच हा बंगला वसला आहे. युती सरकारच्या काळात इथं उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांचं वास्तव्य होतं. त्यामुळं या बंगल्याशी आपल्या भावना जोडल्या गेल्या आहेत, असं सांगत पंकजा मुंडे यांनीही या बंगल्यावर दावा सांगितल्याचं समजतंय.
'रामटेक' मिळाला नाही तर अजित पवार वास्तव्यास होते तो देवगिरी बंगला मिळावा अशी इच्छा सुधीर मुनगुंटीवारांनी व्यक्त केलीय. शालेय आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी चित्रकूट बंगल्याची मागणी केलीय. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे अनेक वर्ष या बंगल्यात वास्तव्य होतं.
हर्षवर्धन पाटील राहत होते तो पर्णकुटी बंगलाही आलिशान आहे. या बंगल्यासाठी उद्योगमंत्री प्रकाश मेहता आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मागणी केलीय. हर्षवर्धन पाटील यांच्याकडे सहकार खाते होते म्हणून नव्या सहकार मंत्र्यांनी याच बंगल्याची मागणी केलीय, तर या बंगल्यासमोर जैन मंदिर आहे, त्यामुळे मेहतांनी हा बंगला मागितला आहे.
आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांनी सागर बंगल्याची मागणी केलीय. तर पहिल्यांदा आमदार आणि मंत्री झालेल्या विद्या ठाकूर यांनी मंत्रालयासमोरील ब – 1 हा बंगला मागितला आहे.
हवे चांगले दालन!
बंगल्यांप्रमाणेच मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर असलेल्या उपमुख्यमंत्र्यांसाठीच्या विशाल दालनावरही ज्येष्ठ मंत्र्यांची नजर आहे. या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे सगळ्यात ज्येष्ठ असल्यानं त्यांना हे दालन मिळेल अशी शक्यता आहे.
भाजपामध्ये सुरुवातीला मुख्यमंत्रीपदावरून आणि नंतर मंत्रीपदावरून नाराजी नाट्य दिसून आले. आता बंगले आणि मंत्री दालनावरून भाजपाच्या मंत्र्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. खरं तर हा संघर्ष आहे तो ज्येष्ठतेवरून, भविष्यातही विविध मुद्यांवरून हा संघर्ष वाढत जाईल ही शक्यता नाकारता येत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.