www.24taas.com, मुंबई
अनधिकृत फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईमुळे बदलीला सामोरं जावं लागलेले पोलिस अधिकारी वसंत ढोबळे यांना मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवर घेण्याची मागणी मनसेनं केली होती. याला सकारात्मक प्रतिसाद देत महापौर सुनिल प्रभू यांनी आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र पाठवलंय.
यात मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केलेल्या मागणीनुसार उचित कारवाई करण्याची सूचना महापौरांनी केलीये. उद्धव यांच्या मुलाखतीनंतर मनसे आणि शिवसेनेचे संबंध सुधारण्याबाबत चर्चा सुरू असतानाच महापौरांनी इतकी तत्परता दाखवल्यानं या चर्चेला बळकटी मिळालीये.
पोलीस अधिकारी वसंत ढोबळे यांना मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आणा अशी मागणी, मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी काही दिवसापूर्वी केली होती. त्यासंदर्भात त्यांनी मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांना एक पत्र देखील पाठवले होते. त्यांच्या याच पत्राला महापौरांनीही सकारात्मक दृष्टीने घेतले आहे. त्यामुळेच मनसेच्या आवाहनाला शिवसेनेची हाक दिली असल्याचे दिसून येत आहे.
महापौर सुनील प्रभू यांनी मनसेचे हे पत्र महापालिका आयुक्त सीताराम कुंठे यांना पाठवून दिले आहे. आणि त्यानुसार योग्य ती कारवाई होईल, आणि त्या पत्राचा योग्य असा विचार केला जाईल असेही महापौरांनी सांगितले.
वसंत ढोबळे यांना मुंबईत अतिक्रमण आणि फेरीवाला नियमन यासाठी पुन्हा एकदा रूजू करावे यासाठी मनसेने मागणी केली होती. ढोबळेंसाठी मनसेने बॅटिंग सुरू केल्याचे दिसत आहे. पण त्यामुळे मनसेला पुन्हा सेनेची साथ मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.